बातम्या

तिकीट घेतलं नेत्यांचं… पण फोटो मात्र गायब! नशिराबादमध्ये नव्या राजकारणाचा ट्रेंड?

एबी फॉर्म’वर साहेबांची सही?, पण बॅनरवर साहेबांनाच ‘नई’; हीच का तुमची ‘पक्षनिष्ठा’?

राजकारणात ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ ही म्हण नवी नाही, परंतु नशिराबाद नगरपंचायत निवडणुकीत काही उमेदवारांनी या म्हणीचा जो काही प्रत्यय आणून दिला आहे, तो राजकीय कृतघ्नतेचा कळस गाठणारा आहे. सध्या नशिराबादच्या सोशल मीडिया बॅनरवर एक विचित्र विरोधाभास पाहायला मिळत आहे. उमेदवारांना पक्षाचे ‘चिन्ह’ हवे आहे, स्थानिक गल्लीतील पदाधिकाऱ्यांची ‘साथ’ हवी आहे, पण ज्या जिल्हास्तरीय नेत्यांच्या सहीने उमेदवारी मिळाली, त्या नेत्यांचे फोटो मात्र बॅनरवरून गायब झाले आहेत. हा प्रकार म्हणजे ज्या ताटात जेवले, तिथेच छिद्र पाडण्याचा प्रकार आहे.

शिडीचा वापर आणि विसर निवडणूक जाहीर होण्यापूर्वी याच उमेदवारांची अवस्था काय होती? उमेदवारी मिळावी म्हणून जळगावला जिल्हा नेत्यांच्या बंगल्याचे उंबरठे कोणी झिजवले? ‘साहेब, तुम्ही म्हणाल ते धोरण आणि बांधाल ते तोरण’ अशा आणाभाका कोणी घेतल्या? त्यावेळी नेत्यांची ‘क्रेझ’ आणि ‘वजन’ महत्त्वाचे वाटत होते. पण एकदा का पक्षाचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ (AB Form) हातात पडला, की उमेदवारांना सोयीस्कर विसर पडलेला दिसतो. ज्या नेत्याच्या अधिकाराने, ज्यांच्या विश्वासार्हतेवर तुम्हाला पक्षाचे चिन्ह मिळाले, त्यांचाच चेहरा बॅनरवर लावताना तुम्हाला संकोच का वाटावा? ही भीती आहे की गद्दारी?

चिन्ह सोयीचे, पण नेता गैरसोयीचा? जर उमेदवारांना असे वाटत असेल की, जिल्हा नेत्यांचे फोटो लावल्याने मते कमी होतील, तर मग मुळात त्यांच्या पक्षाचे तिकीट घेण्याचा मोह तरी का झाला? जर स्वतःच्या हिंमतीवर आणि केवळ स्थानिक संपर्कावर निवडून येण्याची खात्री होती, तर ‘अपक्ष’ म्हणून रिंगणात उतरण्याचे धाडस का दाखवले नाही? पक्षाचे चिन्ह वापरायचे, कारण हक्काची ‘व्होट बँक’ हवी आहे; पण नेत्यांचे फोटो वगळायचे, कारण ‘अँटी-इनकबन्सी’चा फटका नको आहे. ही दुतोंडी भूमिका म्हणजे मतदारांच्या डोळ्यात धूळफेक आणि नेतृत्वाचा उघड अपमान आहे.

नेत्यांनो, तुम्हीही जागे व्हा! हा प्रश्न फक्त बॅनरपुरता मर्यादित नाही. हे बॅनर म्हणजे भविष्यातील बंडखोरीची नांदी आहे. जो उमेदवार निवडणुकीच्या काळात नेत्याचा फोटो लावण्यास कचरतो, तो निवडून आल्यावर पक्षाच्या आदेशाचे पालन करेल, याची शाश्वती काय? जळगाव जिल्ह्यातील ज्या नेत्यांनी यांना तिकीट दिले, त्यांनीही हा प्रकार गांभीर्याने घ्यायला हवा. ‘तिकीट आमचे, पण चेहरा तुमचा’ हे समीकरण चालवून घेता कामा नये.

पक्षात शिस्त आणि प्रोटोकॉल नावाची काही गोष्ट शिल्लक आहे की नाही? स्थानिक पदाधिकारी बॅनरवर झळकतात, पण जिल्ह्याचे नेते अदृश्य होतात, हे चित्र जळगावच्या राजकारणातील विस्कळीतपणा दर्शवते.

मतदार राजा सुज्ञ आहे. ज्यांना स्वतःच्या नेत्याविषयी आदर नाही, ज्यांच्यात उपकाराची जाणीव नाही, ते उमेदवार सामान्य जनतेशी किती प्रामाणिक राहतील, याचे उत्तर नशिराबादकरांना वेगळे सांगण्याची गरज नाही. बॅनरवर चेहरा असो वा नसो, पण या ‘फोटो-पॉलिटिक्स’ने उमेदवारांचा खरा चेहरा मात्र नक्कीच उघडा पाडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!