राजकारण

जळगावात महायुतीत मोठी फूट! जागावाटपावरून बिनसले; भाजप ७५ जागांवर ‘स्वबळावर’ लढणार?

जळगाव | विशेष प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणातून अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. जागावाटपाच्या तिढ्यामुळे महायुतीमधील चर्चा फिस्कटली असून, भारतीय जनता पक्षाने आता ७५ जागांवर स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. रविवारी दिवसभर झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील बैठकीतून तडकाफडकी बाहेर पडले, तर मंत्री गिरीश महाजन यांनीही पुढील रणनीतीसाठी कार्यकर्त्यांची धावती बैठक घेऊन नाशिककडे प्रस्थान केले आहे.

नेमका पेच काय?

अजिंठा विश्रामगृह येथे रविवारी सकाळपासून महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये तीव्र मतभेद पाहायला मिळाले:

शिवसेनेची मागणी: विद्यमान स्थिती पाहता शिवसेनेने २५ ‘विनिंग’ जागांची मागणी लावून धरली होती.

भाजपचा प्रस्ताव: भाजपने शिवसेनेला १९ आणि राष्ट्रवादीला ६ जागा देण्याचा प्रस्ताव मांडला होता.

परिणाम: शिवसेनेला हा प्रस्ताव अमान्य असल्याने चर्चा फिस्कटली आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील बैठकीतून अर्धवट उठून निघून गेले.

नेत्यांची ‘गुप्त’ रवानगी

बैठक निष्फळ ठरल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी माध्यमांना टाळत काढता पाय घेतला. मंत्री गिरीश महाजन पुढच्या दाराने बाहेर पडले, तर आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार राजूमामा भोळे मागील दाराने रवाना झाले. या गोपनीयतेमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

भाजपचा ‘मिशन ७५’ प्लॅन

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने आता कोणाचीही वाट न पाहता सर्व ७५ जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार मंगेश चव्हाण आणि राजूमामा भोळे यांनी जागावाटप आणि तिकीट वितरणाबाबतची अंतिम चर्चा पूर्ण केली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी रेल्वेने नाशिककडे रवाना होण्यापूर्वी आपल्या कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

“आम्ही युतीसाठी चर्चा केली, पण सन्मानजनक तोडगा न निघाल्यास पक्ष स्वबळावर लढण्यास सज्ज आहे,” असे संकेत भाजपच्या गोटातून मिळत आहेत.

या संपूर्ण राजकीय घडामोडींवर भाजप आणि शिवसेना अधिकृतपणे सायंकाळपर्यंत आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. आता जळगावच्या या ‘पॉवर गेम’मध्ये महायुतीचे भवितव्य काय असेल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!