राजकारण

७७ व्या वर्षी ‘अनवाणी’ विजयाची दौड; नशिराबादमध्ये आजीबाईंचा ‘करिश्मा’!

नशिराबाद (जळगाव) राजकारणात वयाची सत्तरी ओलांडली की, नेत्यांना अनेकदा ‘मार्गदर्शक मंडळा’चा रस्ता दाखवला जातो. शारीरिक थकवा आणि बदलत्या काळाचा वेग, यांमुळे ज्येष्ठांना बाजूला सारण्याची नवी रीत रूढ होत आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद नगरपंचायतीच्या निकालाने या समजुतीला केवळ धक्काच दिला नाही, तर एक जोरदार चपराक लगावली आहे. प्रभाग क्रमांक ७ (अ) मधून भाजपच्या तिकिटावर ७७ वर्षांच्या जनाबाई रंधे यांचा झालेला विजय हा केवळ एका जागेचा विजय नाही, तर तो प्रबळ इच्छाशक्तीचा आणि जमिनीशी नाळ जोडलेल्या ‘मातीतल्या’ राजकारणाचा विजय आहे.

​या विजयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जनाबाईंची साधी पण तितकीच कणखर जीवनशैली. वयाच्या ७७ व्या वर्षी साधारणतः वृद्धांना चालताना आधाराची गरज भासते, हातात काठी येते. पण जनाबाई याला अपवाद आहेत. त्यांच्या हातात ना आधाराची काठी आहे, ना पायात संरक्षणासाठी चप्पल! तळपत्या उन्हात, अनवाणी पायांनी आणि कोणाच्याही आधाराविना (काठीशिवाय) त्यांनी ज्या हिंमतीने प्रचार केला, तो आजच्या हायटेक आणि एसी गाड्यांतून फिरणाऱ्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.

​नशिराबादच्या मतदारांनी जनाबाईंच्या या ‘अनवाणी’ संघर्षाला भरभरून साथ दिली. आजकाल निवडणुकीत ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ आणि ‘सोशल मीडिया वॉर’ महत्त्वाचे मानले जाते. पण, “माझ्या गावात फिरायला मला चपलेची काय गरज?” हा जनाबाईंचा रोकठोक सवाल आणि हातात काठी न घेता ताठ कण्याने उभे राहण्याची त्यांची जिद्द, मतदारांना आपल्या घरातील आजीच्या मायेसारखी वाटली. पायाला चटके बसत असतानाही चेहऱ्यावर हास्य ठेवून मतदारांशी संवाद साधणे, हे कोणत्याही ‘पीआर एजन्सी’ला जमणारे कौशल्य नाही, ते रक्तांतच असावे लागते.

​हा विजय तरुणांसाठीही एक धडा आहे. हातात स्मार्टफोन आणि मनात नैराश्य घेऊन जगणाऱ्या पिढीसमोर, हातात काठी नसलेल्या ७७ वर्षांच्या आजीबाईंनी ‘जिद्द’ म्हणजे काय असते, हे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. लोकशाहीत आजही ‘संपर्का’ला आणि ‘साधेपणा’ला पर्याय नाही, हेच या निकालाने अधोरेखित केले.

​नवनिर्वाचित जनाबाई रंधे यांचे अभिनंदन करतानाच, त्यांनी अनवाणी पायांनी जो वसा घेतला आहे, तो विकासकामांच्या बाबतीतही असाच अविरत सुरू राहील, हीच अपेक्षा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!