महानगरी एक्स्प्रेसमध्ये ‘बॉम्ब’चा मेसेज! देशविरोधी घोषणा, ISI च्या उल्लेखाने खळबळ; मध्य रेल्वे मार्गावर ‘हाय अलर्ट

जळगाव/भुसावळ: मुंबई-चेन्नई/कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या महानगरी एक्स्प्रेसच्या शौचालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकीवजा संदेश आणि देशविरोधी घोषणा आढळून आल्याने आज मध्य रेल्वेच्या संपूर्ण मार्गावर प्रचंड खळबळ उडाली. एक्स्प्रेसच्या एका डब्यातील स्वच्छतागृहात ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘आयएसआय’ (ISI) यांसारखी आक्षेपार्ह वाक्ये लिहिलेली आढळल्याने सर्व सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगाव आणि भुसावळसह सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महानगरी एक्स्प्रेसच्या एका डब्यातील स्वच्छतागृहात अज्ञात व्यक्तीने हा धमकीवजा संदेश लिहिला होता. यात ‘पाकिस्तान झिंदाबाद’, ‘आयएसआय’ अशा उल्लेखांसह गाडीत बॉम्ब असल्याची गंभीर धमकी देण्यात आली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांमार्फत ही बाब निदर्शनास येताच, सुरक्षा यंत्रणांनी तातडीने सूत्रे हलवली.
भुसावळ स्थानकावर कसून तपासणी
या घटनेची माहिती दादर स्थानकापासूनच रेल्वे प्रशासनाला मिळाली होती, तेव्हापासूनच मार्गावरील सर्व स्थानकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. महानगरी एक्स्प्रेस सकाळी ८.३० वाजता भुसावळ स्थानकावर दाखल होताच, रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोहमार्ग पोलीस (GRP) यांच्या पथकांनी गाडीला वेढा दिला.
तात्काळ श्वान पथक (Dog Squad) आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाला (BDDS) पाचारण करण्यात आले. या पथकांनी संपूर्ण एक्स्प्रेसच्या प्रत्येक डब्याची, प्रवाशांच्या सामानाची आणि स्वच्छतागृहांची कसून तपासणी केली. प्रवाशांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते, मात्र सुरक्षा दलांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.
अधिकारी काय म्हणाले?
याबाबत बोलताना भुसावळ रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक पी. आर. मीना यांनी सांगितले, “सदरची माहिती दादर येथूनच प्राप्त झाली होती, त्यामुळे सर्व स्थानके हाय अलर्टवर होती. गाडीमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘आयएसआय’ असे लिहिलेले आढळले, मात्र ते कोणीतरी पुसून टाकण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसले. भुसावळ स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या बीडीडीएस स्कॉडने संपूर्ण गाडीची तपासणी केली.”
संपूर्ण तपासणीअंती कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळल्याने, सकाळी ९ वाजता महानगरी एक्स्प्रेसला भुसावळ स्थानकावरून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आले.
हा संदेश केवळ खोडसाळपणा होता की यामागे एखादा मोठा कट होता, याचा तपास जीआरपी (लोहमार्ग पोलीस) आणि आरपीएफचे अधिकारी करत आहेत. जीआरपी पोलीस निरीक्षक सुधीर धायकर यांच्या मार्गदर्शनाखालीही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सध्या रेल्वे मार्गावर सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे.



