जळगाव तालुका पोलीस ‘मस्त’, LCB ‘ॲक्शन मोड’वर! तालुका पोलिसांच्या हद्दीत घुसून LCB ची ‘सर्जिकल स्ट्राईक’; अवैध वाळू उत्खननाचा अड्डा उद्ध्वस्त
गिरणा लुटली जात होती, स्थानिक पोलीस झोपेत होते? LCB च्या छाप्यामुळे अवैध धंदा उघड.

जळगाव: जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत, अगदी नाकावर टिच्चून, गेल्या कित्येक महिन्यांपासून गिरणा नदीपात्राची अक्षरशः चाळण सुरू होती. महसूल प्रशासन थातूरमातुर कारवाई करत होते आणि तालुका पोलीस ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करत होते. मात्र, या सर्व ‘सेटिंग’वर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जबरदस्त प्रहार केला आहे. तालुका पोलिसांच्या हद्दीत थेट कारवाई करत LCB ने खेडी खुर्द शिवारातील गिरणा नदीपात्रातून कोट्यवधी रुपयांचा अवैध वाळू साठा, तीन ट्रॅक्टर आणि वाळू उपसणारी ‘किनी’ मशीन जप्त केली.या कारवाईने LCB च्या धडाडीचे कौतुक होत असतानाच, “हे सर्व इतके दिवस तालुका पोलिसांना कसे दिसले नाही?” असा संतप्त सवाल उपस्थित होत असून, त्यांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
LCB ची धडाकेबाज कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द गावाजवळील गिरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची ‘खात्रीशीर’ माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे LCB चे उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ विजय पाटील, नितीन बाविस्कर, मुरलीधर धनगर, रविंद्र कापडणे यांच्या पथकाने शुक्रवारी (दि. ७) थेट नदीपात्रात छापा टाकला.
यावेळी पथकाला धक्कादायक दृश्य दिसले. रविंद्र गोकुळ सपकाळे (रा. खेडी, खुर्द) हा वाळू माफिया ट्रॅक्टरला लावलेल्या किनी मशीनच्या सहाय्याने बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा करत होता. पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्या घरासमोरच वाळू वाहतुकीसाठी सज्ज असलेले तीन ट्रॅक्टरही उभे होते. LCB ने तात्काळ कारवाई करत:
- १५ ब्रास वाळूचा साठा
- ३ ट्रॅक्टर
- १ किनी मशीन
असा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. LCB च्या या धडक कारवाईने जिल्ह्यातील संपूर्ण वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
..मग तालुका पोलीस काय करत होते?
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, स्थानिक तालुका पोलिसांची संशयास्पद भूमिका.
गेल्या अनेक महिन्यांपासून हा अवैध उपसा सुरू होता. नदीपात्रात मोठमोठी यंत्रे, ट्रॅक्टर्सची रात्रंदिवस वर्दळ सुरू होती. हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही तालुका पोलिसांना याचा साधा सुगावाही लागला नाही, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.
- स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादानेच हा गोरखधंदा सुरू होता का?
- महसूल आणि पोलीस प्रशासनाचा वाळू माफियांना छुपा पाठिंबा होता का?
- LCB ला थेट ‘त्यांच्या’ हद्दीत येऊन कारवाई का करावी लागली?
LCB च्या या एकाच कारवाईने तालुका पोलिसांच्या ‘कारभारा’चे धिंडवडे काढले आहेत. आपल्याच हद्दीतील एवढा मोठा अवैध धंदा रोखू न शकणे, ही तालुका पोलिसांसाठी अत्यंत नामुष्कीजनक बाब मानली जात आहे. आता पोलीस अधीक्षक या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन स्थानिक पोलिसांची ‘चौकशी’ लावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



