लाकूड वाहतूक ट्रक सोडवण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी; पारोळ्याच्या वनपालसह तिघांवर गुन्हा
गाडी सोडायची असेल तर लाच द्या!” महिला वनपालच ठरली आरोपी!

जळगाव: शेतातील निबांचे झाडे तोडून होणारी वाहतूक बेकायदेशीर ठरवत, पकडलेला ट्रक सोडण्याच्या मोबदल्यात २,५०,००० रुपयांची लाच मागून तडजोडीअंती १,००,००० रुपये स्वीकारण्यास संमती दिल्याप्रकरणी पारोळा वन विभागाच्या एक महिला वनपाल, एक खाजगी सॉ मिल मालक आणि अन्य एका वन कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), नाशिक/जळगाव यांनी केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार यांच्या भावाने शेतातील निबांची झाडे तोडून ती मालेगाव येथे नेण्यासाठी एका ट्रकमध्ये भरली होती. सदर ट्रक सावित्री फटाके फॅक्टरीसमोर आला असता, वन विभागाच्या वनपाल श्रीमती वैशाली गायकवाड, एक वनविभागाचा कर्मचारी आणि श्रीकृष्ण सॉ मिलचे मालक श्री. सुनिल धोबी यांनी तो अडवला.
तक्रारीची पार्श्वभूमी
- वनपाल वैशाली गायकवाड यांनी, सदर ट्रक बेकायदेशीर लाकूड वाहतूक करत असल्याचे कारण सांगून, दिनांक १४/१०/२०२४ रोजी पकडला.
- पकडलेले वाहन गायकवाड यांनी पारोळा येथील श्रीकृष्ण सॉ मिल येथे लावून दिले होते.
- तक्रारदार आणि त्यांच्या भावाने वेळोवेळी गायकवाड मॅडम व अन्य वन कर्मचाऱ्यास भेटून गाडी सोडण्याची विनंती केली.
- सुरुवातीला, गाडी सोडण्याच्या मोबदल्यात लोकसेवकांनी २,५०,००० रुपयांची मागणी केली.
- तडजोडीअंती, वनपाल वैशाली गायकवाड मॅडम व त्यांच्या सहकारी वन कर्मचाऱ्याने १,००,००० रुपये खाजगी इसम सुनिल धोबी यांच्याकडे देण्यास सांगितले.
एसीबीची कारवाई व पडताळणी
या घटनेनंतर, तक्रारदार यांनी दिनांक १०/१२/२०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्याच दिवशी (१०/१२/२०२४) एसीबीने पंच साक्षीदारांसमक्ष तक्रारीची पडताळणी केली.
पडताळणी दरम्यान, श्रीकृष्ण सॉ मिल, पारोळा येथे खाजगी इसम श्री. सुनिल धोबी, लोकसेवक श्रीमती वैशाली गायकवाड आणि एक वन विभागाचा कर्मचारी यांनी तक्रारदाराच्या भावाचा पकडलेला ट्रक व त्यातील मालावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात लाच म्हणून १,००,००० रुपयांची (अक्षरी एक लाख रुपये) मागणी केल्याचे पंच साक्षीदारांसमक्ष निष्पन्न झाले.
गुन्हा दाखल
या पडताळणीच्या आधारे, दिनांक २९/१०/२०२५ रोजी पारोळा पोलीस ठाणे, जि. जळगाव येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २६४/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींची नावे:
१) श्रीमती वैशाली गायकवाड: पद – वनपाल (वर्ग ३), नेमणूक – वन विभाग, कार्यालय पारोळा.
२) श्री. सुनिल धोबी: खाजगी इसम, मालक – श्रीकृष्ण सॉ मिल, पारोळा.
३) एक वन विभागाचा कर्मचारी: नेमणूक – वन विभाग, कार्यालय पारोळा (नाव गाव माहित नाही).
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७, ७ (अ) आणि १२ प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा पथक व मार्गदर्शन
सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक श्री. योगेश ठाकूर (पर्यवेक्षण अधिकारी) आणि पोलीस निरीक्षक श्रीमती नेहा तुषार सुर्यवंशी (सापळा अधिकारी) यांच्या पथकाने केली. या पथकात सपोउपनि दिनेशसिंग पाटील, पोना राकेश दुसाणे, पोना बाळु मराठे (सर्व ला.प्र.वि. जळगांव), पोहवा विनोद चौधरी, चापोहवा परशुराम जाधव (दोन्ही ला.प्र.वि. नाशिक), पोहवा नरेंद्र पाटील, व पोना सुभाष पावरा (दोन्ही ला.प्र.वि. नंदुरबार) यांचा समावेश होता.
ही कारवाई मा. श्री. भारत तांगडे (पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक), मा. श्री. माधव रेड्डी (अपर पोलीस अधीक्षक) आणि मा. श्री. सुनिल दोरगे (अपर पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



