डिजिटल’ प्रशासन झाला ‘म्यूट’! जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे फेसबुक पेज बंद का?
आयुष प्रसाद यांचा पारदर्शक उपक्रम ‘थांबला’! नवीन जिल्हाधिकाऱ्यांनंतर फेसबुक पेज ‘साइलेंट’!

जळगाव ३० ऑक्टोंबर २०२५ :जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी ‘जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव’ हे फेसबुक पेज सुरू केले. हा उपक्रम म्हणजे प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील थेट संवादाचा एक प्रभावी पूल ठरला होता. मात्र, जिल्ह्यात नवीन जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे रुजू झाल्यानंतर, गेल्या जवळपास तीन आठवड्यांपासून हा गतिमान संवादाचा पूलच नि:शब्द झाला आहे. प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजाची माहिती देणारे हे पेज ११ ऑक्टोबरपासून स्तब्ध (inactive) असल्याने, जळगावकरांच्या मनात प्रशासनाच्या ‘गतिमानते’विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
श्री. आयुष प्रसाद यांनी सुरू केलेला हा डिजिटल संवाद केवळ शासकीय प्रसिद्धीपुरता मर्यादित नव्हता; तर तो प्रशासकीय प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग बनला होता. दररोज होणाऱ्या महत्त्वाच्या बैठका, घेतलेले निर्णय, जनहिताची माहिती, शासकीय योजना आणि सूचना तात्काळ या पेजवरून जळगावकरांपर्यंत पोहोचत होत्या. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात नेमके काय सुरू आहे, कोणते निर्णय प्रलंबित आहेत आणि प्रशासन कोणत्या दिशेने काम करत आहे, याचा स्पष्ट आरसा जनतेला पाहायला मिळत होता. ‘प्रशासन काम करत आहे’ हा विश्वास या पेजने निर्माण केला होता.
परंतु, सत्तांतर व्हावे तसा हा बदल प्रशासकीय पातळीवर झाला आहे. श्री. रोहन घुगे यांनी ९ ऑक्टोबरच्या सुमारास पदभार स्वीकारला. ११ ऑक्टोबरच्या शेवटच्या पोस्टनंतर या पेजवर अक्षरशः शुकशुकाट आहे. याचा अर्थ असा होतो का, की जिल्ह्यात बैठका होणे थांबले आहे? जनहिताचे निर्णय घेतले जात नाहीत? की महत्त्वाच्या घडामोडी घडत नाहीत? अर्थात, तसे कदापिही नाही. नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार घेतल्यापासून अनेक बैठका, आढावे आणि निर्णय नक्कीच झाले असणार. मग, ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा कमी का पडत आहे?
एका चांगल्या अधिकाऱ्याने सुरू केलेली पारदर्शक कार्यपद्धत, दुसऱ्या अधिकाऱ्याच्या आगमनानंतर बंद पडणे, हे प्रशासकीय सातत्याच्या (administrative continuity) दृष्टीने अत्यंत चुकीचे आहे. श्री. घुगे हे स्वतः ठाणे जिल्हा परिषदेत आपल्या गतिमान कामासाठी ओळखले जातात. अशा परिस्थितीत, त्यांच्याच कार्यकाळात जळगाव प्रशासनाच्या डिजिटल प्रतिमेला असा ‘ऑफलाईन’ ब्रेक लागावा, हे अनाकलनीय आहे.
आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे आहे. ‘गुड गव्हर्नन्स’ (Good Governance) किंवा सुशासनाची पहिली पायरीच पारदर्शकता आणि जलद संवाद आहे. फेसबुक पेज बंद पडल्याने प्रशासनाचे काम थांबलेले नाही, परंतु जनतेला तसे वाटू लागल्यास प्रशासनाची प्रतिमा ‘स्लो-मोड’वर गेल्याशिवाय राहणार नाही.
नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर त्रुटीची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. प्रशासकीय यंत्रणेला केवळ एक आदेश देऊन, हा उत्तम उपक्रम पुन्हा सुरू करता येऊ शकतो. जळगावकरांना त्यांच्या प्रशासनाकडून होणाऱ्या कामाची माहिती मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तो अबाधित ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांची आहे. अपेक्षा आहे, की हा ‘म्यूट’ झालेला संवाद लवकरच ‘अनम्यूट’ होईल आणि जळगावचे प्रशासन पुन्हा एकदा ‘डिजिटल’ पटलावर गतिमान झाल्याचे दिसेल.




