बातम्या

शाळेत मुले शिकायला येतात की डुक्कर? वरणगावच्या शिक्षण मंदिरात प्रशासनाचा ‘वराह’ अवतार!

शाळा हे संस्कारांचे केंद्र असते, विद्येचे पवित्र मंदिर असते. तिथे मुलांवर स्वच्छतेचे, शिस्तीचे आणि आरोग्याचे संस्कार केले जातात. मात्र, जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील ‘महात्मा गांधी विद्यालय’ या नावाजलेल्या शाळेची सध्याची अवस्था पाहून पालकांचा आणि सुज्ञ नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. शाळेच्या आवारात सध्या विद्यार्थ्यांपेक्षा डुकरांचा वावर जास्त वाढला असून, “ही शाळा नक्की मुलांसाठी आहे की डुकरांसाठी?” असा संतप्त सवाल आता जनता विचारत आहे.

ज्या महात्मा गांधींनी आयुष्यभर ‘स्वच्छता ही सेवा’ असा संदेश दिला, त्याच गांधीजींच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या शाळेच्या प्रांगणात आज घाणीचे साम्राज्य आणि डुकरांचा उच्छाद पाहायला मिळतोय, यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? लहानगी मुले पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन ज्ञानामृत मिळवण्यासाठी शाळेत येतात, पण शाळेच्या गेटवर आणि मैदानात त्यांना डुकरांचे कळप स्वागत करताना दिसतात. हा प्रकार केवळ किळसवाणाच नाही, तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणारा आहे.

भीती आणि आरोग्याचा प्रश्न

शाळेच्या आवारात मुक्तपणे फिरणारी डुक्करं केवळ अस्वच्छताच पसरवत नाहीत, तर लहान मुलांच्या सुरक्षेसाठीही मोठा धोका आहेत. एखाद्या वेळी या डुकरांनी लहान मुलांवर हल्ला केला, तर त्याला जबाबदार कोण? वर्गात शिक्षकांनी स्वच्छतेचे धडे द्यायचे आणि खिडकीबाहेर मुलांनी घाण आणि डुक्कर बघायचे, यातून मुलांनी नक्की काय शिकायचे? शाळेचे प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था नक्की कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत? एखाद्या विद्यार्थ्याचे बरे-वाईट झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का?

वरणगाव नगरपरिषद आणि शाळा व्यवस्थापन या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असेच म्हणावे लागेल. शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर असताना, निदान शाळेसारख्या संवेदनशील ठिकाणी तरी तत्परता दाखवणे अपेक्षित होते. पण “आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय” (येथे डुक्कर) अशी अवस्था प्रशासनाची झाली आहे.

स्थानिक प्रशासन जर कुंभकर्णी झोपेत असेल आणि शाळेच्या तक्रारींकडे कानाडोळा करत असेल, तर आता जळगाव जिल्हाधिकारी आणि जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांनीच या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे. शाळेच्या पटांगणात मुलांऐवजी डुक्कर बागडत असतील, तर हा संपूर्ण जिल्हा प्रशासनाचा आणि शिक्षण विभागाचा मोठा पराभव आहे.

‘स्वच्छ भारत’ आणि ‘सुंदर शाळा’ असे कागदी घोडे नाचवणाऱ्या प्रशासनाच्या नाकाखाली वरणगावात हा प्रकार घडतोय. त्यामुळे CEO साहेबांनी आता वरणगावात येऊन पाहणी करण्याची वाट न पाहता, तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आणि स्थानिक प्रशासनाला धारेवर धरावे. शाळेचा परिसर २४ तासांत ‘डुक्करमुक्त’ करण्याचे आदेश द्यावेत. मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बेजबाबदार यंत्रणेवर आता ‘मोठ्या साहेबांनी’च कारवाईचा बडगा उगारावा, हीच पालकांची आणि जनतेची माफक अपेक्षा आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!