बातम्या

जामनेरमध्ये गिरीश महाजनांचा ‘मास्टरस्ट्रोक’! विरोधकांचे शस्त्रम्यान; साधनाताई महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध

जामनेर / जळगाव: जिल्ह्यातील १८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, या रणधुमाळीत मंत्री गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच जामनेरमध्ये निकालाआधीच विजयाचा गुलाल उधळला1 गेला आहे. जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या उमेदवार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी सौ. साधनाताई महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे.

निवडणुकीपूर्वीच भाजपची विजयी सलामी

जामनेर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद यंदा ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर, साधनाताई महाजन यांचा दांडगा अनुभव आणि मागील कार्यकाळ पाहता, भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावरच पुन्हा विश्वास टाकला. मंत्री गिरीश महाजन यांनी आपली संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावत जामनेरमध्ये एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे.

विरोधकांची माघार: महायुती आणि आघाडीचे उमेदवार मागे

निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याआधीच आज (२० नोव्हेंबर) अर्ज माघारीच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मंत्री महाजन यांच्या रणनीतीपुढे विरोधकांनी नांगी टाकली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. विरोधकांनी मैदान सोडल्यामुळे साधना महाजन यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले.

जिल्ह्यातील पहिली ‘बिनविरोध’ नगरपालिका

विशेष म्हणजे, या निवडणुकीत बिनविरोध नगराध्यक्ष निवडणारी जामनेर नगरपालिका ही जळगाव जिल्ह्यातील पहिलीच नगरपालिका ठरली आहे. भाजपने एकूण २७ जागांपैकी ५ जागांवर बिनविरोध विजय मिळवत सुरुवातीलाच मोठी आघाडी घेतली आहे.

बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक:

नगराध्यक्षांसह भाजपचे खालील नगरसेवक देखील बिनविरोध विजयी झाले आहेत:

  1. १. उज्वला दीपक तायडे
  2. २. किलुबाई शेवाळे
  3. ३. सपना रवींद्र झाल्टे
  4. ४. संध्या जितेंद्र पाटील
  5. ५. नानाभाऊ बाविस्कर

जामनेरमधील या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून, मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा आपला करिश्मा सिद्ध केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!