राजकारण

महायुतीचा फॉर्म्युला फिक्स ? जागावाटपाची ‘इनसाईड स्टोरी’ उघड?

जळगाव: आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचे चित्र स्पष्ट झाले असल्याचे भासवत असले, तरी प्रत्यक्षात जागावाटपाचा ‘पेच’ अद्याप सुटलेला नाही. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अनिल पाटील यांनी महायुतीची घोषणा केली असली, तरी पडद्यामागे जागांच्या आकड्यांवरून रस्सीखेच सुरूच आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने ‘मोठा भाऊ’ म्हणून आपली पकड कायम ठेवली असून, भाजप ४६, शिवसेना (शिंदे गट) २३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ०६ अशा फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, या आकड्यांमुळे स्थानिक पातळीवर नाराजीनाट्य रंगण्याची चिन्हे आहेत.

जळगाव शहरावर राजकीय वर्चस्व कोणाचे, यावरून सुरू असलेल्या चढाओढीत भाजपने ५० जागांचा आग्रह धरला होता. मात्र, विद्यमान राजकीय समीकरणे आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) आक्रमक पवित्र्यामुळे हा आकडा ४६ वर येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पालकमंत्र्यांचा पक्ष असल्याने शिवसेनेने २५ जागांखाली तडजोड करण्यास नकार दिला होता, तरीही त्यांना २३ जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. सर्वात मोठा पेच हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या जागांचा होता. अखेर ६ जागांवर राष्ट्रवादीची मनधरणी केली जाण्याची चर्चा आहे.

मैत्रीपूर्ण लढतीं’चा धोका?

महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी समझोता केला असला, तरी स्थानिक कार्यकर्ते आणि इच्छुकांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. एकाच प्रभागात महायुतीचे दोन घटक पक्ष दावा करत असल्याने, काही ठिकाणी ‘अधिकृत उमेदवार’ विरुद्ध ‘मित्रपक्षाचा अपक्ष’ असा सामना दिसू शकतो. यामुळे एकाच प्रभागात महायुतीचे वेगवेगळे चिन्ह राहण्याची शक्यता असून, प्रचारादरम्यान मतदारांमध्ये संभ्रम आणि कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवू शकतात.

मंत्र्यांच्या दरबारी अंतिम निर्णय:

आमदार मंगेश चव्हाण आणि अनिल पाटील यांच्यात प्राथमिक चर्चा झाली असली, तरी या फॉर्म्युल्यावर अंतिम मोहोर उमटवण्याचे सर्वाधिकार राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आहेत. या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीतच जागावाटपाचा हा तिढा सुटेल. मात्र, तोपर्यंत इच्छुकांचे जीव टांगणीला लागले असून, बंडखोरी थोपवणे हेच महायुतीसमोरचे खरे आव्हान असणार आहे.

जागावाटपाचे संभाव्य गणित (सूत्रांच्या माहितीनुसार):

  • भाजप: ४६
  • शिवसेना (शिंदे गट): २३
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट): ०६
  • एकूण: ७५

(सदर वृत्त हे राजकीय गोटात सुरू असलेल्या चर्चा आणि ‘विश्वसनीय सूत्रांनी’ दिलेल्या माहितीवर आधारित आहे. महायुतीकडून याबाबत अद्याप अधिकृत यादी किंवा घोषणा करण्यात आलेली नाही. मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या अंतिम बैठकीनंतरच या जागावाटपावर शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे जागांच्या या आकडेवारीत अंशतः बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.”)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!