राजकारण

जळगाव मनपा रणसंग्राम: भाजपने फुंकले निवडणुकीचे बिगुल;

विद्यमान नगरसेवकांची 'धाकधूक' तर नव्या दमाच्या शिलेदारांची 'फिल्डिंग' जोरात!

जळगाव | विशेष प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात आता खऱ्या अर्थाने उष्णता वाढली आहे. विरोधक अजून चाचपणी करत असतानाच, भारतीय जनता पार्टीने मात्र नेहमीप्रमाणे आघाडी घेत ‘इलेक्शन मोड’ ऑन केला आहे. येत्या सोमवारी, १५ डिसेंबर २०२५ रोजी भाजपच्या उमेदवार मुलाखतींचा धडाका सुरू होत असून, या प्रक्रियेमुळे पक्षांतर्गत ‘गृहकलह’ की ‘शिस्त’ दिसून येणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

भाजपचे संकटमोचक आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मुलाखती म्हणजे केवळ औपचारिकता नसून, ती आगामी काळातील मोठ्या राजकीय फेरबदलाची नांदी ठरणार आहे. विशेष म्हणजे, या मुलाखतींमध्ये जुन्या आणि जाणत्या नगरसेवकांच्या कामगिरीचे ‘ऑडिट’ होणार असल्याने विद्यमान नगरसेवकांची झोप उडाली आहे. “माझे तिकीट कापले तर जाणार नाही ना?” ही भीती अनेकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
दुसरीकडे, पक्षात नव्याने सक्रिय झालेली तरुण फळी आणि विविध आघाड्यांमधून आलेले नवीन इच्छुक उमेदवार प्रचंड आत्मविश्वासाने रिंगणात उतरले आहेत. “केवळ पक्षाचा शिक्का नाही, तर स्वतःची ताकद आणि वॉर्डातील जनसंपर्क याच्या जोरावर त्यांनी उमेदवारीवर दावा ठोकला आहे.

जळगाव शहरातील बदललेल्या समीकरणांचा विचार करता, ही निवडणूक भाजपसाठी सोपी असली तरी, तिकीट वाटप हीच खरी डोकेदुखी ठरणार आहे. अनेक प्रभागांमध्ये पक्षाकडे एकापेक्षा जास्त ‘तुल्यबळ’ उमेदवार आहेत. जे उमेदवार गेल्या काही महिन्यांपासून वॉर्डात स्वखर्चाने कामे करत आहेत, त्यांची तयारी जोरात आहे. जर पक्षाने त्यांना तिकीट नाकारले, तर हे उमेदवार ‘अपक्ष’ किंवा ‘अन्य पक्षाचा’ झेंडा हाती घेऊन भाजपच्या अधिकृत उमेदवारालाच आव्हान देण्याच्या तयारीत आहेत, अशी खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे गिरीशभाऊ महाजन आणि आ. राजूमामा भोळे हे ‘बंडखोरी’ कशी थोपवणार, हाच खरा प्रश्न आहे.

हायप्रोफाईल पॅनल घेणार मुलाखती
सोमवारी, १५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जी.एम. फाउंडेशन (भाजप जिल्हा कार्यालय) येथे मुलाखतींना सुरुवात होईल. यासाठी स्वतः मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे आणि महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी हे उमेदवारांची झाडाझडती घेतील.

वेळ मंडळ क्रमांक प्रभाग क्रमांक

  1. सकाळी ११:०० वाजता मंडळ क्र. ०१ प्रभाग क्र. ११, १२, १३
  2. दुपारी १२:०० वाजता मंडळ क्र. ०२ प्रभाग क्र. ०१, ०२, ०३, ०४
  3. दुपारी ०२:०० वाजता मंडळ क्र. ०३ प्रभाग क्र. ०५, ०६, ०७, १५
  4. दुपारी ०३:०० वाजता मंडळ क्र. ०४ प्रभाग क्र. १४, १६, १७, १८, १९
  5. दुपारी ०४:०० वाजता मंडळ क्र. ०५ प्रभाग क्र. ०८, ०९, १०

“जळगावच्या राजकीय आखाड्यात यावेळी एक वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. वर्षानुवर्षे पक्षात काम करणाऱ्या निष्ठावंतांसोबतच, ज्यांच्यावर आजवर कोणत्याही पक्षाचा शिक्का (Label) नाही, असे ‘कोरी पाटी’ असलेले नवीन व तरुण चेहरेही भाजपच्या तिकिटासाठी आग्रही आहेत. ‘आमच्याकडे जरी राजकीय अनुभव नसला, तरी प्रभागात आमचे स्वतंत्र अस्तित्व आणि कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आहे,’ असा दावा हे उमेदवार करत आहेत. जर या ‘स्वयंघोषित’ ताकदीला भाजपच्या ‘कमळ’ चिन्हाची साथ मिळाली, तर विजय शंभर टक्के निश्चित आहे, अशी ‘गॅरंटी’च हे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते नेतृत्वाकडे मांडत आहेत. त्यामुळे केवळ ‘पक्षांतर्गत निष्ठा’ की ‘निवडून येण्याची क्षमता’ (Elective Merit), या पेचात पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार आहे.”

जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा वारू चौफेर उधळण्यासाठी आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांनी पडद्यामागून जी जबरदस्त व्यूहरचना आखली आहे, ती पाहता कार्यकर्त्यांमध्ये ‘मामा आहेत, तर विषय हार्ड आहे’ अशी भावना निर्माण झाली आहे. शांत, संयमी आणि मृदुभाषी स्वभाव असूनही, राजकारणातील अचूक टायमिंग साधण्यात राजूमामांचा हातखंडा आहे. एका सामान्य कार्यकर्त्यालाही नावानिशी ओळखणारे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. उमेदवारांची निवड असो की प्रचाराची रणनीती; मामांच्या ‘मायक्रो-मॅनेजमेंट’मुळे विरोधकांचे मनसुबे उधळून लावले जाणार हे निश्चित मानले जात आहे. ‘विकासकामांचा धडाका आणि राजूमामांची रणनीती’ हे समीकरण जुळून आल्याने, जळगावकरांनी भाजपला कौल द्यायचा ठरवले आहे, असा विश्वास पक्षात व्यक्त होत आहे.”

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!