राजकारण

जळगाव महापालिका निवडणूक: प्रभाग १६ मध्ये सौ. मयुरी जितेंद्र चौथे ‘गेमचेंजर’?

। जळगाव । विशेष प्रतिनिधी । ​जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, प्रभाग क्रमांक १६ मधून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटासाठी निष्ठावंतांना प्राधान्य मिळण्याचे संकेत आहेत. भाजपाचे अत्यंत जुने व एकनिष्ठ कार्यकर्ते जितेंद्र (जितू भाऊ) चौथे यांच्या पत्नी सौ. मयुरी जितेंद्र चौथे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असून, एका सुशिक्षित आणि कार्यक्षम महिला नेतृत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. राज्याचे मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन आणि आमदार राजू मामा भोळे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या चौथे कुटुंबाला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याने प्रभागातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

निष्ठेचे फळ आणि संघर्षाचा वारसा

जितेंद्र चौथे हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पक्षाच्या पडत्या काळातही त्यांनी संघटनात्मक बांधणीत मोलाची भूमिका बजावली आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग १८ मधून त्यांनी निकराची लढत दिली होती, मात्र त्यांचा निसटता पराभव झाला होता. तरीही खचून न जाता, त्यांनी समाजकार्य अविरत सुरू ठेवले. या निष्ठेची दखल घेत आणि ‘कष्टाळू कार्यकर्त्याला न्याय’ या भूमिकेतून पक्षश्रेष्ठींनी यावेळी सौ. मयुरी चौथे यांच्या रूपाने चौथे कुटुंबावर विश्वास टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

गिरीश भाऊ व राजू मामांचे पाठबळ

जळगावच्या राजकारणात नामदार गिरीश महाजन आणि आमदार राजू मामा भोळे यांचा शब्द प्रमाण मानला जातो. जितेंद्र चौथे हे या दोन्ही नेत्यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच प्रभाग १६ मध्ये भाजपाची ताकद वाढवण्यासाठी आणि विकासकामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी सौ. मयुरी चौथे यांची उमेदवारी ‘गेमचेंजर’ ठरू शकते.

“काम बोलेल, शब्द नाही”

सौ. मयुरी चौथे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ करतानाच विकासाचा अजेंडा स्पष्ट केला आहे. त्या म्हणाल्या, “केवळ आश्वासने न देता, प्रभागातील रस्ते, गटारी, स्वच्छता आणि महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न मार्गी लावणे हेच माझे ध्येय आहे. माझे पती जितू भाऊ यांनी उभे केलेले जनसंपर्काचे जाळे आणि पक्षाची विचारसरणी घेऊन मी जनतेसमोर जात आहे. जनतेचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच माझ्या कामाची पावती असेल.”

प्रभागातील जनमत

प्रभाग १६ मध्ये सध्या चौथे कुटुंबाच्या जनसंपर्कामुळे वातावरण निर्मिती झाली आहे. एकीकडे सुशिक्षित महिला उमेदवार आणि दुसरीकडे जितू भाऊंचे ‘नेटवर्क’ यामुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. महिलांचे सक्षमीकरण आणि युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ म्हणून मतदार सौ. मयुरी चौथे यांच्याकडे पाहत आहेत.

​आगामी निवडणुकीत भाजपाची विचारधारा, नेत्यांचे पाठबळ आणि जनसामान्यांशी असलेली नाळ या त्रिसूत्रीवर सौ. मयुरी चौथे यांचा विजय हा केवळ एका उमेदवाराचा नसून, सामान्य कार्यकर्त्याच्या निष्ठेचा विजय असेल, असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!