राजकारण

जळगावचा राज्यात ‘डबल धमाका’! ना. गुलाबराव पाटलांच्या पाणीपुरवठा विभागाची उत्तुंग भरारी; जिल्हाधिकारी कार्यालयही राज्यात अव्वल!

'काम कागदावर नाही, गावात दिसलं पाहिजे'; ना. गुलाबराव पाटलांच्या कामाची राज्याकडून दखल, पाणीपुरवठा विभागाला मानाचे स्थान.

जळगाव/मुंबई | विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन आणि क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘गुड गव्हर्नन्स’ (सुशासन) स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या क्रमवारीत राज्यात थेट तिसरा क्रमांक पटकावला असून, दुसरीकडे त्यांनीच पालकत्व स्वीकारलेल्या जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवत दुहेरी यश संपादन केले आहे. या कामगिरीमुळे राज्यात सध्या ‘गुलाबराव पाटील पॅटर्न’ ची जोरदार चर्चा सुरू आहे.

२०० पैकी १७०.५० गुण: प्रशासकीय कामगिरीवर शिक्कामोर्तब राज्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी १५० दिवसांचा ‘ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ राबविण्यात आला होता. यात राज्यातील तब्बल ५७ मंत्रालयीन विभागांचे मूल्यमापन करण्यात आले. यात सार्वजनिक बांधकाम विभागाने पहिला, तर वन विभागाने दुसरा क्रमांक मिळवला. मात्र, ग्रामीण भागातील जनतेच्या थेट आरोग्याशी आणि दैनंदिन गरजांशी निगडित असलेल्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने २०० पैकी १७०.५० गुण मिळवत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. हे यश केवळ आकडेवारीचे नसून, एका क्लिष्ट विभागाचे सुसूत्र व्यवस्थापन करण्याचे मोठे प्रशासकीय यश मानले जात आहे.

‘काम कागदावर नाही, गावात दिसलं पाहिजे’ मंत्री गुलाबराव पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून विभागाची कार्यपद्धती बदलली आहे. “काम कागदावर नाही, तर गावात दिसलं पाहिजे,” ही त्यांची रोकठोक भूमिका प्रशासनाला कामाला लावणारी ठरली.

  • जलजीवन मिशन: घराघरात नळजोडणी.

  • स्वच्छता: शौचालये, घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ गाव अभियान.

  • डिजिटल प्रशासन: ई-फाईलिंग, वेळेत प्रशासकीय निर्णय आणि पारदर्शकता. या त्रिसूत्रीमुळे पाणीपुरवठा विभागाने आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, त्याचे श्रेय थेट मंत्री पाटील यांच्या कार्यपद्धतीला दिले जात आहे.

जळगाव जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे, ना. गुलाबराव पाटील हे ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्या जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मंत्री आणि प्रशासन यांच्यातील उत्तम समन्वय, शिस्तबद्ध नियोजन आणि गतिमान अंमलबजावणीचे हे उत्तम उदाहरण जळगाव जिल्ह्याने राज्यासमोर ठेवले आहे. पालकमंत्र्यांचा प्रशासनावर असलेला वचक आणि लोकहिताच्या कामांचा धडाका यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना प्रशासकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

जनतेच्या विश्वासाला बळ पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग म्हणजे केवळ घोषणांचा विभाग नसून, ‘प्रत्यक्ष परिणाम देणारा विभाग’ अशी नवी प्रतिमा तयार झाली आहे. राज्यभरात समान दर्जाची सेवा, डिजिटल ट्रॅकिंग आणि लोकसहभागामुळे हे खाते अव्वल ठरले आहे. या यशानंतर आता राज्यभरात ‘गुलाबराव पाटील पॅटर्न’ची चर्चा असून, कामात वेग, निर्णयात ठामपणा आणि अंमलबजावणीत शिस्त म्हणजे गुलाबराव पाटील, हे समीकरण पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

ही कामगिरी म्हणजे केवळ गुणांची यादी नसून, ग्रामीण महाराष्ट्राच्या जीवनमानात सुधारणा घडवणाऱ्या नेतृत्वाची ही पोचपावती असल्याचे मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!