जळगाव शहरात पोलिसांचे ‘विशेष ऑपरेशन’; आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संशयितांवर धडक कारवाई!
अवैध दारू विक्रीवर छापे; शांतता भंग करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल, अनेकांवर बडगा

जळगाव, दि. १२ नोव्हेंबर:आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, जळगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार,मा अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षकांनी स्वतः रस्त्यावर उतरून जळगाव शहरात एक विशेष ऑपरेशन राबवले.दिनांक ११ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजेपासून ते १२ नोव्हेंबरच्या मध्यरात्री ००.३० वाजेपर्यंत हे ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबविण्यात आले. या मोहिमेत शहरातील विविध भागांतील शांतता भंग करणाऱ्या तसेच संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींवर व अवैध धंद्यांवर पोलिसांनी जोरदार कारवाई केली.या विशेष मोहिमेसाठी अपर पोलीस अधीक्षक, त्यांच्या कार्यालयातील अंमलदार, क्यूआरटी (QRT) पथक आणि आरसीपी (RCP) पथक तैनात करण्यात आले होते. जळगाव शहर, एमआयडीसी आणि जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.
एमआयडीसी परिसरात ७ जणांवर कारवाई
एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील रामेश्वर कॉलनी, मास्टर कॉलनी, कासमवाडी, तुकारामवाडी, तांबापुरा, कंजरवाडा या संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. या कारवाईत, बी.पी. अॅक्ट ११२/११७ नुसार एकूण ०७ इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत.
जिल्हापेठ हद्दीत १८ जणांवर गुन्हे
जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीतही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. कांचननगर, विठ्ठलपेठ, डॉ. आंबेडकर नगर, गोपाळपुरा, कोळीपेठ, मेस्कोमातानगर, गुरुनानक नगर, शनिपेठ गवळीवाडा, ज्ञानदेव नगर, दाळफळ, तळेले कॉलनी, शंकर अप्पा नगर या ठिकाणी राबवलेल्या ऑपरेशनमध्ये:
- मुंबई पोलीस अॅक्ट १२२ प्रमाणे १४ इसमांवर कारवाई करण्यात आली.
- मोटार वाहन अधिनियमान्वये ०२ इसमांवर कारवाई करण्यात आली.
- बी.पी. अॅक्ट ११२/११७ प्रमाणे ०२ इसमांवर कारवाई करण्यात आली.
शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्रीवर छापे
जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी अवैध धंद्यांना लक्ष्य केले. शिवाजी नगर, गेंदालाल मिल, राजमालती नगर, शाहुनगर परिसरात मोहीम राबवताना पोलिसांना दोन ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
- एस. के. ऑईल मिल समोर: भिंतीलगत एक इसम देशी दारूची चोरटी विक्री करत असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ९० मिली मापाच्या १४ बाटल्या (किंमत ५६० रुपये) जप्त करण्यात आल्या. आरोपीविरुद्ध मु.प्रो.का.क ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- विकास बिअर शॉपी: जळगाव दूध फेडरेशनजवळील मिथीला अपार्टमेंटखाली असलेल्या विकास बिअर शॉपीमध्ये विनापरवाना देशी-विदेशी दारूची अवैध विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी दुसरी मोठी छापा कारवाई केली. येथून तब्बल १६,४६५ रुपये किमतीच्या एकूण १६९ देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणीही आरोपीविरुद्ध मु.प्रो.का.क ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय, शहर हद्दीत ‘कोटपा’ कायद्यान्वये ०१ इसमावर कारवाई करून २०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे की, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारच्या अचानक विशेष मोहिमा (Surprise Operations) यापुढेही राबविण्यात येणार आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि शांतता भंग करणाऱ्यांवर पोलीस दलाची करडी नजर राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.



