“शिंदे गटाचा आक्रोश, भाजपचा प्रत्युत्तर प्रहार – पाचोरातून ‘सत्तेची सराईत लढाई’”
पाचोरातून पेटलेलं वादळ, महायुतीच्या गोटात गडगडणारं वातावरण!"

जळगाव : महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगूल वाजलं असलं तरी सत्ताधारी महायुती पक्षांमध्ये सारं काही आलबेल आहे, असं म्हणता येणार नाही. कारण अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षांमधला मतभेद उफाळून येताना दिसतोय. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात टोकाचा वाद दिसतोय. तर जळगावमध्ये सत्ताधारी शिवसेना आणि भाजपात सारं काही आलबेल आहे, असं म्हणता येणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे भडगाव-पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात जाहीरपणे भाजपवर निशाणा साधला होता. त्यांच्या टीकेला आता चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे हा वाद जास्त टोकाला गेला तर महाराष्ट्राच्या राजकारणात कदाचित वेगळ्या गोष्टी घडू शकतात आणि त्याचं केंद्र कदाचित जळगाव असू शकतं का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
नगरपरिषदांच्या निवडणुकीचा बिगुल वाढल्यानंतर आता राजकीय नेत्यांचे देखील फटाके वाजायला सुरुवात झाली आहे. पाचोरा येथे आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार मंगेश चव्हाण होते. त्यांनी पाचोरा येथे आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका करताना सांगितले की, चाळीसगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचा एक नगरसेवक निवडून आणून दाखवावे. मी त्यांचा जाहीर सत्कार करेन. त्यांनी पाचोर्यामध्ये येऊन किशोर पाटील यांना आव्हान दिलं आहे. शिवसेना शिंदे गटाचा निर्धार मेळावा नुकताच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाचोरा येथे पार पडला होता. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. तसेच आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक कवडी देखील निधी आम्हाला दिला नसल्याची खंत भर सभेत त्यांनी बोलवून दाखवली होती. आज भारतीय जनता पार्टीचा पाचोरा येथे मेळावा पार पडला. या मेळाव्याला मंत्री गिरीश महाजन यांची देखील उपस्थिती लाभणार होती. मात्र ते या मेळाव्याला गैरहजर राहिले. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थित सभेला संबोधित करताना सांगितले की, “किशोर आप्पा हे माझे आमदार होण्यापूर्वीचे चांगले मित्र आहेत आणि होते. त्यांना मदत करून देखील ते जाहीर सांगतात की, भाजपने मला मदत केली नाही.””खरंतर असे म्हणतात की, पोलिसासोबत मैत्री करू नये. आम्ही ती मैत्री केली होती. मात्र मैत्री निभवणे हा ठराविक लोकांमध्येच गुण असतो. तुम्ही चांगले राजकीय नेते देखील भविष्यात होऊ शकतात. पण आयुष्यात चांगले मित्र तुम्ही कदापि राहू शकत नाही”, अशी टीका मंगेश चव्हाण यांनी केली.
“दिलीप वाघ खरं तर तुमची चूक होती, तुम्ही सांगितले की माझा बजेट कमी आहे. आता यांनीही सांगितले आहे की, दिलीप भाऊंनी सर्व बजेट वाढवलेला आहे. त्यामुळे दिलीप भाऊंचा असा बजेट वाढलेला आहे सर्व गोष्टींची कमी पडणार नाही. तुम्ही देखील अचंबित व्हाल”, असं वक्तव्य मंगेश चव्हाण यांनी केलं.”गिरीश भाऊंनी देखील सांगितलेले आहे, आमंत्रण देताना सर्वांना आमंत्रण दिले गेले पाहिजे. चुलीला निमंत्रण पाहिजे. कुठेही बजेट कमी पडता कामा नये. त्यामुळे आम्ही आता तुमच्यासोबत असल्याने कुठल्याही बजेटची कमी पडणार नाही किंवा संपणार नाही. याची तुम्ही चिंता करू नये. भर सभेत किशोर आप्पा सांगतात की, मुख्यमंत्र्यांनी एक दमडी आम्हाला एका वर्षात दिली नाही. तुमची दानत नाही म्हणून तुम्ही निधी तुमच्या मतदारसंघात आणू शकत नाही”, अशी टीका मंगेश चव्हाण यांनी केली.”चाळीसगावला जाताना मला पाचोरा, भडगाव लागतील. त्यामुळे येणे-जाणे या रस्त्यावर माझे सुरू असते. मात्र किशोर आप्पांना असे वाटते की हा पाचोरामध्ये लक्ष घालत आहे. किशोर पाटलांनी देखील चाळीसगाव येथे येऊन सभा घेतली. बैठकी घेतली. मी तर किशोर आप्पांना आव्हान देतो, तुम्ही पक्ष वाढीसाठी प्रयत्न केलाच पाहिजे. यात माझे दुमतही नाही. तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा. अप्रत्यक्षरीत्या मी तुमची मदत करेन. मात्र चाळीसगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचा एक नगरसेवक तरी निवडून आणून दाखवावे. किशोर पाटलांचा पाचोऱ्यात येऊन जाहीर सत्कार करेन”, असे खुले आव्हान आमदार मंगेश चव्हाण यांनी किशोर पाटील यांना दिले.



