बातम्या

विनापरवाना ४ ब्रास वाळूने भरलेला हायवा डंपर जप्त, पहाटेच्या कोंबिंग ऑपरेशनमधील मोठी कारवाई

पोलिसांचा अचूक अंदाज: ट्रॉलीतून गळणारे पाणी ठरले वाळू तस्करीचे धागेदोरे

जळगाव: शहरात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. शुक्रवारी (दि. १४) पहाटेच्या सुमारास, जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने कोंबिंग ऑपरेशन दरम्यान विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा एक हायवा डंपर पकडला. या कारवाईत पोलिसांनी अंदाजे ४ ब्रास वाळूसह डंपर जप्त केला असून, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे ५:३० वाजताच्या सुमारास पोलीस पथक (ज्यात पोउपनि राजेंद्र उगले, पोहकॉ/३९६ किरण चौधरी, पोहकॉ/९११ गिरीश पाटील, पोहकॉ/७० रामकृषण पाटील, पोहकॉ/२७०० विलास पाटील यांचा समावेश होता) हे पोलीस स्टेशन हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबवत होते.

अजिंठा चौफुलीवर मनोहर हॉटेलसमोर त्यांना एक हायवा डंपर भरधाव वेगाने जाताना दिसला. विशेष म्हणजे, या डंपरच्या ट्रॉलीमधून पाणी गळत असल्याने पोलिसांना त्यामध्ये ओली वाळू असल्याचा प्रबळ संशय आला.

पथकाने तात्काळ हा डंपर थांबवून चालक गजानन शाळीक तायडे (वय ३८, रा. कठोरा, ता. यावल) याला वाहनात काय आहे याबाबत विचारणा केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे देत वाळू असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याबद्दल (रॉयल्टी पावती) विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे त्याने कबूल केले.

त्यानंतर पोलिसांनी डंपरवर चढून पाहणी केली. त्यावेळी डंपरमध्ये अंदाजे ४ ब्रास वाळू भरलेली असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ वाळूसह डंपर जप्त केला.

याप्रकरणी, अवैध गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी चालक गजानन तायडे याच्याविरुद्ध फिर्यादीवरून जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता, २०23 (BNS) चे कलम ३०३(२), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८(७), ४८(८) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ९ व १५ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोहकॉ/२७१ चंद्रकांत पाटील हे करत आहेत. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!