चिनावलमध्ये बंद घराला फोडून चोरट्यांचा डल्ला; शिक्षकाचे सव्वा दोन लाखांचे दागिने लंपास!
शिक्षक कुटुंबियांसह बाहेरगावी गेल्याची साधली संधी; रावेर तालुक्यातील घटनेने खळबळ

रावेर, ता. १५ (श्री मराठी न्युज ):रावेर तालुक्यातील चिनावल (ता. रावेर) येथील एका शिक्षकाच्या बंद घराचा कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सुमारे २ लाख १२ हजार २६६ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी शिक्षक हे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता, चोरट्यांनी ही संधी साधत आपला हेतू साध्य केला. या धाडसी घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चिनावल येथील तुकाराम वाडी परिसरात राहणारे शिक्षक हे काही कामानिमित्त आपल्या कुटुंबासह घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. हीच बाब हेरून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचा कोंडा (कडी) तोडून आत प्रवेश केला.घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी घरातील लोखंडी गोदरेज कपाट कशानेतरी उचकटून उघडले आणि त्यातील तिजोरी उघडून सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला.
चोरट्यांनी लंपास केलेला ऐवज:
चोरट्यांनी कपाटातून:
- ७०,३९३ रु. किमतीचा ४० ग्रॅमचा राणीहार
- १७,५६७ रु. किमतीची १० ग्रॅमची अंगठी
- १४,०४० रु. किमतीची ०८ ग्रॅमची अंगठी
- ४४,४५४ रु. किमतीच्या २५ ग्रॅम वजनाच्या दोन बांगड्या
- ८,७७५ रु. किमतीची ०५ ग्रॅमची अंगठी
- १३,६०० रु. किमतीचा १५ ग्रॅम सोन्याचा तुकडा
- ४३,४३७ रु. किमतीचा २८ ग्रॅमचा दुसरा राणीहार
असा एकूण २,१२,२६६/- (दोन लाख बारा हजार दोनशे सहासष्ट रुपये) किमतीचा ऐवज चोरून नेला.
घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी, फिर्यादी शिक्षकाच्या तक्रारीवरून रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. राहुल सानप हे करीत आहेत.



