बातम्या

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प

पायाभूत सुविधा, शेती, उद्योग व महिला सक्षमीकरणावर ठोस भर – महाराष्ट्रालाही मोठा लाभ

जळगाव प्रतिनिधी – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आजचा अर्थसंकल्प हा विकसनशील भारताला विकसित भारताकडे नेणारा दिशादर्शक व संतुलित अर्थसंकल्प आहे. शहरीकरणाचे नियोजनबद्ध रूप, उद्योग व उद्योजकतेला प्रोत्साहन, तसेच गुंतवणूक व रोजगार निर्मितीसाठी खंबीर आणि दीर्घकालीन उपाययोजना या अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसून येतात.

पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी १२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय हा देशाच्या आर्थिक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे रस्ते, रेल्वे, दळणवळण, औद्योगिक वसाहती आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचनासाठी करण्यात आलेल्या भरीव तरतुदी या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या ठरणार आहेत. शेतकरी, पशुपालक आणि मत्स्यव्यवसायाशी निगडित घटकांना या योजनांचा थेट लाभ मिळेल.‘लखपती दिदी’ योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स, उद्योग आणि व्यवसाय संधी निर्माण करण्याची घोषणा ही महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल आहे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला यामुळे नवी दिशा मिळेल.

उद्योग क्षेत्रात रोजगार निर्मिती हे मुख्य ध्येय ठेवून गुंतवणुकीला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. याचा महाराष्ट्रालाही मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असून, आगामी काळात राज्यात नव्या गुंतवणुका, उद्योग आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील.एकूणच, गुंतवणूक, रोजगार, शेती, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधा या सर्व घटकांचा समतोल साधणारा हा अर्थसंकल्प असून विकसित भारताच्या संकल्पनेला साकार करणारा ठरेल.

— ना. गुलाबराव पाटील, पालकमंत्री, जळगाव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!