राजकारण

जळगाव महापालिकेचे रणांगण:’स्वबळा’च्या तलवारी की ‘युती’ची ढाल? जळगाव भाजप-सेनेत सुप्त संघर्ष!

जळगाव: खान्देशात सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे थंडीचा पारा कुठेतरी कमी होताना दिसत असला, तरी जळगावचे राजकीय तापमान मात्र विक्रमी पातळीवर वाढताना दिसत आहे. निमित्त आहे, येऊ घातलेल्या जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचे. निसर्गाचा गारवा ओसरतोय, पण निवडणुकीचे ‘रणशिंग’ फुंकले जाण्यापूर्वीच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

राजकीय तापमान गगनाला भिडले आहे.निमित्त आहे, येऊ घातलेल्या जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचे. ‘रणशिंग’ फुंकले जाण्यापूर्वीच शहरातील गल्लीबोळात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र, या सर्व गदारोळात एक प्रश्न सामान्य कार्यकर्त्यापासून ते ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांना सतावतोय – “लढायचं कसं? हातात हात घालून की समोरासमोर शड्डू ठोकून?”

जळगाव महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठीची ही लढाई केवळ सत्तेची नसून अस्तित्वाची आहे. शहरात सध्या भाजपच्या गोटात अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळतोय. भाजपने आपल्या शिस्तबद्ध कार्यशैलीनुसार, निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याआधीच ‘वॉर रूम’ सक्रिय केली आहे. इच्छुकांनी घरोघरी जाऊन जनसंपर्काचा धडाका लावला आहे. हे चित्र पाहता, भाजप स्वबळाची तयारी करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) देखील आपल्या बालेकिल्ल्यात, म्हणजेच जळगावात, कमी लेखली जाण्याची शक्यता नाही.

खरा पेच तिथेच आहे. राज्य पातळीवर ‘महायुती’चे सरकार असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गणितात ‘मैत्री’ पेक्षा ‘महत्त्वाकांक्षा’ मोठी ठरते. जळगावात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची ताकद लक्षणीय आहे. जर युती झाली, तर ७५ जागांचे वाटप कसे होणार? कोणाचा बालेकिल्ला कोण सोडणार? या प्रश्नांवरून स्थानिक पातळीवर ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर वरिष्ठांच्या आदेशानुसार युती झालीच, तर तिकीट न मिळालेले बंडखोर कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाच्या पडद्यामागून ‘गेम’ करतील, ही जळगावच्या राजकारणाची जुनी रीत आहे.

दुसरीकडे, जर ‘स्वबळाचा नारा’ दिला गेला, तर मात्र जळगावात ‘महासंग्राम’ अटळ आहे. युती तुटल्यास होणारी लढत ही विरोधकांपेक्षा ‘मित्रपक्षांतच’ अधिक चुरशीची होईल. भाजपची संघटनशक्ती आणि शिवसेनेचा आक्रमक बाणा जेव्हा आमनेसामने येईल, तेव्हा मतविभागणीचा फटका कोणाला बसणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

शहराचा विकास, रस्ते, पाणीपुरवठा आणि अमृत योजनेचा बोजवारा या मूलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी ‘युती की स्वबळ’ हा राजकीय धुरळा उडवला जात आहे का? हा प्रश्नही सुज्ञ जळगावकरांनी विचारायला हवा. कारण झेंडा कोणाचाही फडकओ, खांदे मात्र सामान्य जळगावकरांचेच वापरले जातात.

वरिष्ठ पातळीवरून आदेश येतील तेव्हा येतील, पण तोपर्यंत स्थानिक नेत्यांची आणि इच्छुकांची घालमेल पाहण्यासारखी आहे. या निवडणुकीत जो पक्ष ‘कार्यकर्त्यांची मनं’ आणि ‘मतदारांचा विश्वास’ जिंकेल, त्याच्याच हाती महापालिकेच्या चाव्या असतील. पण जर सत्तेच्या या साठमारीत युतीचा घोळ संपला नाही, तर जळगावकरांचा कौल अनपेक्षित असू शकतो, हे विसरून चालणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!