राजकारण

जळगावातील ‘आर. सी. बाफना’ चोरी प्रकरण: तेलंगणातून आंतरराज्यीय आरोपी गजाआड

सोन्याची 'लगड' करूनही एलसीबीने आवळल्या मुसक्या

जळगाव शहरातील प्रतिष्ठित सुवर्णपेढी ‘रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’मध्ये (नयनतारा अँड सन्स) ग्राहकाच्या वेशात येऊन हातचलाखीने सोन्याची साखळी लांबवणाऱ्या सराईत आंतरराज्यीय गुन्हेगाराला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तेलंगणा राज्यातून शिताफीने अटक केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपीने चोरीच्या साखळीची वितळवून त्याची ‘लगड’ (Gold Ingot) तयार केली होती; मात्र, जळगाव पोलिसांनी अचूक तपास करत हा मुद्देमाल जप्त केला आहे.

 दिनांक ०९ जानेवारी २०२६ रोजी सुभाष चौकातील आर. सी. बाफना ज्वेलर्समध्ये एक अज्ञात तरुण खरेदीच्या बहाण्याने आला होता. सेल्समनला बोलण्यात गुंतवून ठेवत, त्याने नजरचुकीने १९.३५० ग्रॅम वजनाची आणि अंदाजे २,४९,६१५ रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५ (अ) (निवासाच्या किंवा मालमत्तेच्या जागी चोरी) अन्वये गुन्हा (रजि. नं. ०९/२०२६) दाखल करण्यात आला होता. भरवस्तीत आणि प्रतिष्ठित दुकानात घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

जळगाव ते तेलंगणा: एलसीबीचा ‘टेक्निकल’ तपास: पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) विशेष सूचना दिल्या होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) आणि सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. यात आरोपीचे ‘लोकेशन’ तेलंगणा राज्यात असल्याचे निष्पन्न झाले.

एलसीबीच्या पथकाने त्वरित तेलंगणा गाठले आणि सायबरबाद (Cyberabad) परिसरात सापळा रचून आरोपी भास्कर किसन बानोथ (वय २२, रा. नगाई पल्ली तांडा, जि. यदाद्री भुवनागिरी, तेलंगणा) याला ताब्यात घेतले.

 आरोपी भास्कर बानोथ हा सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे. चोरी केल्यानंतर साखळी तशीच जवळ बाळगल्यास पकडले जाण्याची भीती असल्याने, त्याने ती साखळी वितळवून तिची ‘लगड’ बनवली होती. मात्र, पोलिसांच्या कसून चौकशीपुढे त्याचा बनाव टिकला नाही. पोलिसांनी त्याच्याकडून वितळवलेले सोने (लगड स्वरूपात) जप्त केले असून, चोरीला गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.

: स्थानिक गुन्हे शाखेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला पुढील तपासासाठी शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सध्या शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले आणि पो.कॉ. बोरसे पुढील तपास करत आहेत. आरोपीने अशा प्रकारे इतर राज्यांतही गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

 ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वपोनि राहुल गायकवाड, पोउनि जितेंद्र वल्टे, तसेच अंमलदार प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, सिद्धेश्वर डापकर आणि महेश सोमवंशी तसेच नेत्रम पोकॉ / मुबारक देशमुख ,पोकॉ / पंकज खडसे यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!