मालकाशी मोबाईलवर बोलत असतानाच चोरट्यांनी साधला डाव; स्थानिक गुन्हे शाखेकसह एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू
रेमंड चौकात कुरिअर बॉयच्या डोळ्यात मिरची स्प्रे फेकून १० लाखांची रोकड लंपास

जळगाव: शहरातील एमआयडीसी परिसरात शुक्रवारी सायंकाळी (दि. १४) भर वर्दळीच्या वेळी एका कुरिअर बॉयच्या डोळ्यात मिरची स्प्रे (Chili Spray) फेकून, त्याच्याकडील १० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग दोन अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेमंड चौकाजवळील आधार पतसंस्थेच्या कार्यालयासमोर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेने जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे.याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील एका कंपनीची १० लाख रुपयांची पेमेंट रक्कम घेऊन एक कुरिअर बॉय बसस्थानक भागातील त्याच्या जुन्या दुकानाकडे जात होता. सायंकाळी ७ च्या सुमारास रेमंड चौकाजवळ आला असता, त्याला त्याच्या कंपनी मालकाचा फोन आला.

त्यामुळे, त्याने आधार पतसंस्थेच्या कार्यालयासमोर रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवली आणि तो मालकाशी मोबाईलवर बोलू लागला. नेमकी हीच संधी साधत, (बहुतेक) पाळत ठेवून असलेल्या दोन चोरट्यांनी त्याला गाठले. एकाने कुरिअर बॉयच्या डोळ्यात थेट मिरची स्प्रे मारला, तर दुसऱ्याने झटापट करत त्याच्या हातातील १० लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून घेतली.डोळ्यांची प्रचंड जळजळ होत असल्याने कुरिअर बॉयला काही कळण्याच्या आतच, दोन्ही चोरट्यांनी छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच, स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ परिसरात नाकाबंदीचे आदेश दिले. रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.



