बातम्या

भुसावळात रक्तरंजित खून! किरकोळ वादातून धारदार शस्त्राने तरुणाचा खून; जळगावचे आरोपी फरार

पोलिस तपास सुरू ,जळगाव जिल्हा असुरक्षित? नागरिकांत भीतीचं वातावरण

भुसावळ प्रतिनिधी │ जळगाव जिल्ह्यातील खुनांच्या मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीत. काही दिवसांपूर्वी जळगाव शहरात झालेल्या नाना पाटील हत्याकांडानंतर पुन्हा एकदा जिल्हा हादरला आहे. रविवारी रात्री भुसावळ तालुक्यातील कंडारी परिसरात जळगाव येथील तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ वादाचे रूपांतर चक्क जीवघेण्या संघर्षात झाले आणि त्यात एका हातमजुराचा जीव गेला.


🔹 घटनेचा तपशील

रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारास दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मृत तरुणाचे नाव जितेंद्र राजेंद्र साळुंखे (कोळी), वय ४०, रा. गेंदालाल मिल परिसर, जळगाव असे आहे. जितेंद्र हा पत्नी व तीन मुलांसह राहत होता आणि हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील तिघा तरुणांसोबत जितेंद्र हा काही कामानिमित्त भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात गेला होता. तेथे सर्वांनी एका हॉटेलवर मद्यपान केले. दरम्यान, किरकोळ कारणावरून चौघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद काही क्षणांतच उग्र झाला आणि त्याचे रूपांतर भांडणात झाले.


🔹 धारदार शस्त्राने वार – जागीच मृत्यू

वाद वाढताच उपस्थित तिघा तरुणांनी जितेंद्रवर एकामागोमाग धारदार शस्त्राने वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत तो कोसळला. आसपासच्या नागरिकांनी तातडीने त्याला भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी तसेच रुग्णालयात दाखल झाले. जितेंद्र कोळी यांचा मृतदेह पुढील तपासासाठी सरकारी रुग्णालयात हलवण्यात आला आहे.


🔹 पोलिसांचा तपास आणि संशयित आरोपींचा माग

या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, बाजार पेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पीएसआय इकबाल सय्यद, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी उपस्थित होते.

पोलिसांनी परिसराचा पंचनामा करून तपासाची चक्रे सुरू केली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, सदर संशयित आरोपी हे जळगाव शहरातीलच असल्याचे स्पष्ट झाले असून ते सध्या फरार आहेत. त्यांचा माग काढण्यासाठी विशेष पथक रवाना झाले असून लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात येतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


🔹 जिल्ह्यात वाढता गुन्हेगारीचा कहर

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात घडणाऱ्या खुनांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग दोन खुनांच्या प्रकरणांमुळे पोलिसांवर कायदा-सुव्यवस्था टिकवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

सामान्य नागरिक आणि स्थानिक नेत्यांकडून प्रशासनाकडे मागणी होत आहे की, जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर पावले उचलावीत आणि आरोपींना तत्काळ अटक करून उदाहरण घालावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!