बातम्या

७५ हजार तरुणांना प्रशिक्षण, ग्रामीण युवकांना स्टार्टअप्समधून उद्योजक घडवणार: मंत्री मंगलप्रभात लोढा

जळगावात कौशल्य विकास मंत्र्यांची घोषणा; धरणगावात प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

जळगाव, दि. २५: महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक स्टार्टअप्स असणारे राज्य असून, नव्या धोरणानुसार आता ग्रामीण भागातील हजारो तरुणांना स्टार्टअप्सच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक घडवणार असल्याची ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी आज जळगावात दिली. येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच, राज्यभरातील ७५ हजार तरुणांना अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातून स्वयंरोजगार आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विभागाने स्टार्टअप्स व अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांसंदर्भात नवे धोरण अमलात आणले असून, त्यात ग्रामीण भागातील तरुणांसाठी विशिष्ट कोटा राखीव ठेवण्यात आल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.

याच दौऱ्याअंतर्गत, श्री. लोढा यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील डॉ. हेडगेवार नगर येथे क्रांतिवीर खाज्याजी नाईक स्मृतिसंस्थेद्वारे आयोजित ‘मुकुंदराज पणशीकर कौशल्य विकास प्रशिक्षण व उद्योजकता केंद्रा’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्हास्तरीय संस्था प्रमुखांची आढावा बैठकही घेतली.

धरणगाव येथील केंद्रासाठी विविध घोषणा

उद्घाटनाच्या निमित्ताने मंत्री लोढा यांनी संस्थेसाठी अनेक योजनांची घोषणा केली.

प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान: या अंतर्गत टेलिकॉम कस्टमर केअर, मोबाईल हार्डवेअर रिपेअर, डिजिटल मित्र आणि मल्टी स्किल टेक्निशियन असे नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील.

दक्ष प्रकल्प: एससी/एसटी आणि महिलांसाठी विशेष कौशल्य कार्यक्रम राबवण्याचे नियोजन आहे.

महिलांसाठी केंद्र: मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्यानुसार, महिलांसाठी नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्ट-अप योजना: या योजनेअंतर्गत संस्थेच्या दोन महिलांना स्टार्ट-अपसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात येईल.

मुख्यमंत्री उद्योजकता प्रोत्साहन: संस्थेने शिफारस केलेल्या उमेदवारांना ५ लाखांपर्यंतची मदत प्राधान्याने केली जाईल.

राज्यभरात विविध उपक्रम

कौशल्य विकास विभागामार्फत राज्यभरात राबवल्या जाणाऱ्या इतर उपक्रमांचीही माहिती लोढा यांनी दिली. राज्यात सुमारे एक हजार रोजगार मेळाव्यांचे नियोजन करण्यात येत आहे. ‘सेवा पंधरवड्या’निमित्त ४१९ आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी ७५० गावांत स्वच्छता अभियान राबवले. तसेच, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानव दर्शन’ला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यातील सुमारे एक हजार शासकीय व खाजगी आयटीआयमध्ये ‘हीरक महोत्सव’ साजरा करून त्यांचे राष्ट्रसेवेचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!