बातम्या

जळगाव LCB ची आंतरराज्य कारवाई: बऱ्हाणपूर (म.प्र.) येथील रिक्षातील ‘खिसेकापू’ जळगावातून जेरबंद

दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव, (दिनांक १२ नोव्हेंबर): मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर शहरात रिक्षात प्रवाशांना बसवून त्यांचे खिसे कापणाऱ्या अट्टल चोरट्यांना जेरबंद करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. बऱ्हाणपूर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा छडा लावत, LCB ने जळगाव शहरातील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षासह ताब्यात घेतले आहे. वसीम कय्युन खाटीक (वय-३३, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) आणि तौसीफ सत्तार खान (वय-३६, रा. रामनगर, जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुरनं २०२/२०२५ अन्वये, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) (वाहनातील चोरी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अज्ञात आरोपींनी रिक्षात प्रवाशांना बसवून अत्यंत शिताफीने त्यांचे खिसे कापून चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले होते.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना, हा गुन्हा जळगाव येथील पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार वसीम खाटीक आणि तौसीफ खान यांनी त्यांच्या साथीदारांसह केला असल्याची खात्रीशीर व गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांना मिळाली.

या माहितीचे गांभीर्य ओळखून, श्री. गायकवाड यांनी तात्काळ LCB च्या पथकाला सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले. LCB च्या पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने आणि गुप्त बातमीदारांमार्फत माहितीची पडताळणी करत सापळा रचला. पथकाने रेकॉर्डवरील आरोपी वसीम कय्युन खाटीक आणि तौसीफ सत्तार खान यांना शिताफीने ताब्यात घेतले.

ताब्यात घेतल्यानंतर दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता, सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, LCB ने पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी सदरचा गुन्हा हा त्यांच्या इतर साथीदारांसह मिळून केल्याची स्पष्ट कबुली दिली.

गुन्ह्याची कबुली मिळताच, जळगाव LCB ने बऱ्हाणपूर कोतवाली पोलीस स्टेशनच्या पथकाशी संपर्क साधला. दोन्ही आरोपींना आणि गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षासह पुढील कायदेशीर कारवाईकामी मध्यप्रदेश पोलिसांच्या पथकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सदरची कौतुकास्पद कारवाई ही पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. अशोक नखाते, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, तसेच पोलीस अंमलदार अतुल वंजारी, अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, किशोर पाटील, रविंद्र कापडणे, राहुल रगडे, नाना तायडे, व महेश सोमवंशी यांनी मोलाची कामगिरी बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!