बातम्या

धरणगाव तालुक्यात उभी राहतेय ऐतिहासिक ‘जलक्रांती’; पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या नेतृत्वात ३१० किमी नाला खोलीकरणाचे महाअभियान!

"पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात पाण्यासाठी संघर्ष अटळ" - पालकमंत्री गुलाबराव पाटील

पाळधी / धरणगाव / जळगाव प्रतिनिधी, दि. १७ मे :
“आज परिस्थिती अशी आहे की पाऊस पडतो, पण पाणी वाहून जातं. उन्हाळा आला की विहिरी, बोअरवेल कोरड्या पडतात. यंदा भूजल पातळी तब्बल साडेतीन मीटरने खाली गेली आहे. पुढच्या काही वर्षांत संपूर्ण जळगाव जिल्हा ‘डार्क झोन’मध्ये जाण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे नाला खोलीकरण ही आता केवळ शासनाची योजना राहिलेली नसून ती काळाची गरज बनली आहे,” अशा अत्यंत रोकठोक आणि भावनिक शब्दांत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.

​धरणगाव तालुक्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून आणि प्रशासनाच्या साथीने ३१० किलोमीटर लांबीच्या नाला आणि नदीपात्र खोलीकरणाचे महाअभियान (वॉटर मिशन) हाती घेण्यात आले आहे. या कामांची पाहणी आणि विविध विकासकामांचे भूमिपूजन रविवारी (दि.१७) पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

​नाला खोलीकरण: शेतकऱ्याच्या उद्याच्या पाण्याची खात्री
यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले की, “नाला खोलीकरण म्हणजे शेतकऱ्याच्या उद्याची पाण्याची खात्री आहे. हे शेतीला दिलेलं जिवंत पाण्याचं वरदान आहे. आज जे पाणी आपण वाहून जाऊ देतो, तेच उद्या दुष्काळ बनून आपल्या गावाच्या दारात उभं राहतं. नाल्यातील गाळ म्हणजे ‘काळ्या आईचं सोनं’ आहे. हा गाळ जेव्हा शेतकऱ्यांच्या शेतात जाईल, तेव्हा जमिनीची सुपीकता वाढेल, पावसाचे पाणी जमिनीत मुरेल आणि विहिरी जिवंत राहतील. यामुळे शेतकऱ्याला उन्हाळ्यातही पिकांसाठी आधार मिळेल.”

​ही व्यापक जलचळवळ केवळ शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून राबवली जात असून, भविष्यात गावोगावी विहिरी जिवंत राहाव्यात आणि गावाची तहान भागावी, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
​शासनाच्या निधीची वाट न पाहता १४ कोटींचा CSR निधी
विशेष म्हणजे या भव्य प्रकल्पासाठी शासनाच्या निधीची वाट न पाहता लोकसहभाग आणि ‘सीएसआर’ (CSR) फंडातून तब्बल १४ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे. जीपीएस (GPS) ग्रुप, जैन इरिगेशन आणि मेघा इंजिनिअरिंग यांसारख्या विविध संस्थांच्या सहकार्यातून हे काम आकार घेत आहे.

​गावाने गावासाठी उभं राहावं: पालकमंत्र्यांचे आवाहन
शेतकऱ्यांना साद घालताना पालकमंत्री म्हणाले, “गावाने गावासाठी उभं राहिलं पाहिजे. आम्ही या कामासाठी कुणाकडेही आर्थिक मदत मागत नाही आहोत. पण कामासाठी तुमची साथ हवी आहे. नाल्यात जेसीबी आला तर त्याला जागा द्या, निघालेला गाळ स्वतःच्या शेतात टाकण्यासाठी सहकार्य करा. शेतकरी, ग्रामस्थ आणि प्रशासन जर असेच एकत्र आले, तर भविष्यातील पाण्याचं मोठं संकट आपण नक्कीच दूर करू शकू.”

धरणगावचे मॉडेल संपूर्ण राज्यासाठी आदर्श: जिल्हाधिकारी

या पाहणी दौऱ्यात उपस्थित असलेले जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या उपक्रमाचे मुक्त कंठाने कौतुक केले. ते म्हणाले, “हा उपक्रम केवळ नाला खोलीकरणापुरता मर्यादित नाही, तर भविष्यातील जलसुरक्षेचा तो एक व्यापक आराखडा आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अत्यंत दूरदृष्टीने हा विषय हाती घेतला आहे. प्रशासन, सीएसआर संस्था आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित सहभागातून धरणगाव तालुक्यात उभी राहिलेली ही लोकचळवळ भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक ‘आदर्श मॉडेल’ (Role Model) ठरू शकते.”
​अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि कामाचा धडाका
पाळधी-चांदसर भागापासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत धरणगाव तालुक्यात ३१० किलोमीटर लांबीचे नाले आणि नदीपात्रांचे खोलीकरण व रुंदीकरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे अवघ्या दीड महिन्यात ३५ किलोमीटरपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे.

या कामासाठी देशातील मोठ्या नदीजोड प्रकल्पांवर काम केलेल्या ‘यश इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी’मार्फत अत्याधुनिक तांत्रिक सर्व्हे करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक नाल्याचा नैसर्गिक उतार, पाण्याचा जलप्रवाह आणि साठवण क्षमता याचा अचूक अभ्यास करून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हे काम सुरू आहे.
​प्रत्यक्ष पाहणी आणि विकासकामांचे भूमिपूजन
धार, शेरी, पथराड आणि लाडली परिसरात सुरू असलेल्या कामांची पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत बांधावर जाऊन पाहणी केली.
नाला क्रमांक १४: पथराड–शेरी–धार–खामखेडा ते झिरी नदीपर्यंतच्या तब्बल १० किलोमीटर नाला खोलीकरणाच्या कामाची पाहणी करण्यात आली.
नाला क्रमांक १५: शेरी परिसरातील ३ किलोमीटरच्या नाला खोलीकरणाची पाहणी झाली.
शेत रस्ता लोकार्पण: याच दौऱ्यात धार–चांदसर या अत्यंत महत्त्वाच्या शेत रस्त्याचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
साठवण बंधाऱ्याचे भूमिपूजन: शेरी जवळील सुधाकर पाटील यांच्या शेताजवळ २० लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या साठवण बंधाऱ्याचे भूमिपूजनही यावेळी पार पडले.

यांची होती प्रमुख उपस्थिती
यात या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन करणारे युवा नेते तथा तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील हे नाव समावेश करण्यास विनंतीया ऐतिहासिक जलचळवळीच्या पाहणी दौऱ्याला जिल्हाधिकारी रोहन घुगे, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गटविकास अधिकारी किशोर वानखेडे, शाखा अभियंता राहुल मिटकरी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच परिसरातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, स्थानिक सरपंच, पंचायत समिती सदस्य, प्रगतशील शेतकरी आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!