बातम्या

ई-बाईकचा ‘शो-ऑफ’, पण नियमांचा फज्जा! जळगावच्या महापौरांचा विनाहेल्मेट सुसाट प्रवास; मुख्यमंत्र्यांच्या आदर्शाला केराची टोपली

जळगाव (प्रतिनिधी): इंधन बचतीचा आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी आज अधिकृत सरकारी वाहन सोडून ई-बाईकवर महापालिका गाठली. त्यांच्या या ‘नो-व्हेइकल डे’ उपक्रमाचे एकीकडे कौतुक होत असले तरी, दुसरीकडे त्यांनी या प्रवासात ‘हेल्मेट’ न घातल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः दुचाकी चालवताना हेल्मेट घालून आदर्श घालून देतात, मात्र जळगावच्या ‘प्रथम नागरिक’च वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत असल्याने शहरात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

महापौरांचा ‘नो-व्हेइकल डे’ उपक्रम:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला कृतिशील प्रतिसाद देत महापौर दीपमाला काळे यांनी शहरासमोर एक नवा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत इंधनाची परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत महापालिकेचे शासकीय वाहन न वापरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आता दर बुधवारी महापालिकेत ‘नो-व्हेइकल डे’ पाळला जाणार असून, खुद्द महापौर केवळ इलेक्ट्रिक व्हेइकलचा (ई-बाईक) वापर करणार आहेत.

यासोबतच त्यांनी महापालिकेतील कर्मचाऱ्यांनाही ‘व्हेइकल शेअरिंग’ करावे किंवा सार्वजनिक वाहतुकीचा आणि सायकलचा वापर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. बाहेरगावच्या बैठकांसाठी शासकीय वाहनाऐवजी रेल्वे प्रवासावर भर देण्याचेही नियोजन प्रशासकीय स्तरावर करण्यात आले आहे.

चांगल्या उपक्रमाला गालबोट; हेल्मेटचा विसर!

महापौरांचा हा पर्यावरणपूरक निर्णय स्वागतार्ह असला तरी, त्यांच्या आजच्या कृतीने एका मोठ्या चुकीकडे लक्ष वेधले आहे. ई-बाईकवर स्वार होऊन महापालिकेत येताना महापौर ताईंच्या डोक्यावर हेल्मेट नव्हते.

एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा दुचाकीवर प्रवास करतात, तेव्हा ते सुरक्षेचे सर्व नियम पाळून आवर्जून हेल्मेट घालतात. राज्याचा प्रमुख जर नियम पाळतो, तर एका शहराच्या महापौरांना नियमांचा विसर कसा पडतो? असा संतप्त सवाल जळगावकर विचारत आहेत.

सामान्यांना दंड, लोकप्रतिनिधींना सूट?

शहरात सामान्य नागरिकाने विनाहेल्मेट दुचाकी चालवली तर वाहतूक पोलीस तत्काळ कारवाई करून दंड आकारतात. मात्र, शहराची प्रथम नागरिकच जेव्हा विनाहेल्मेट शहरातून फिरते, तेव्हा नियम फक्त सामान्यांसाठीच आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो. एकीकडे चांगला आदर्श ठेवण्यासाठी ई-बाईकचा वापर करायचा आणि दुसरीकडे स्वतःच्याच सुरक्षेला आणि वाहतुकीच्या कायद्याला केराची टोपली दाखवायची, या महापौरांच्या दुटप्पी भूमिकेमुळे त्यांच्या इंधन बचतीच्या चांगल्या उपक्रमावर मात्र पाणी फेरले गेले आहे.

महापौरांनी यापुढे पर्यावरण रक्षणासोबतच वाहतूक नियमांचेही काटेकोर पालन करून खरा आदर्श जनतेसमोर ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!