बातम्या

मुक्ताईनगर हादरले! मानेगावात २३ लाखांची ‘गांजा शेती’ एलसीबीने केली उद्ध्वस्त; ३४१ किलो गांजा जप्त

एलसीबीच्या कारवाईने स्थानिक पोलिसांचे पितळ उघडे?

मुक्ताईनगर: जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलीस अधीक्षकांनी उघडलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव येथे धडक कारवाई करत शेतात लपवून ठेवलेला तब्बल ३४१ किलो ५०० ग्रॅम वजनाचा ओला गांजा जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मुद्देमालाची किंमत २३ लाख २२ हजार २०० रुपये इतकी असून, या प्रकरणी बागायतदार आरोपीस बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यात गांजाची छुपी शेती करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय खबऱ्यामार्फत पक्की माहिती मिळाली की, मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानेगाव शिवारात एका शेतकऱ्याने आपल्या शेतात बेकायदेशीररित्या गांजाची लागवड केली आहे. या माहितीची खातरजमा केल्यानंतर, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली LCB चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी तातडीने एक विशेष पथक तयार केले.

कारवाईचा थरार: तपास पथकाने मानेगाव गाठून संशयित शेताला घेराव घातला. यावेळी शेताची झडती घेतली असता, कापूस किंवा इतर पिकांच्या आडून गांजाची जोमाने वाढलेली झाडे आढळून आली. पथकाने घटनास्थळावरून ५ ते ६ फूट उंचीची एकूण ५१ गांजाची झाडे मुळासकट उपटून जप्त केली. या कारवाईत आरोपी मनोज नामदेव घटे (वय ४०, रा. मानेगाव, ता. मुक्ताईनगर) याला जागीच ताब्यात घेण्यात आले.

कायदेशीर प्रक्रिया: जप्त करण्यात आलेल्या ३ क्विंटल ४५ किलो गांजाचे पंचनामा करून सील करण्याची प्रक्रिया घटनास्थळीच पार पडली. आरोपी मनोज घटे याच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्ट (NDPS Act – अंमली पदार्थ विरोधी कायदा) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक आशिष अडसुळ करीत आहेत.

मानेगावात तब्बल ३४१ किलो गांजा आणि ५१ झाडे जप्त झाली. ही कारवाई कौतुकास्पद असली तरी, ती प्रशासकीय यंत्रणेच्या अपयशाकडे बोट दाखवणारी आहे परंतु ……

  • झाडे एका रात्रीत उगवली का?: ३ क्विंटल वजनाची आणि मानवी उंचीएवढी ५१ झाडे पूर्ण वाढीस लागण्यासाठी किमान ३ ते ४ महिने लागतात. एवढ्या प्रदीर्घ काळात या शेतीचा सुगावा स्थानिक यंत्रणेला लागू नये, हे न पचणारे आहे.

  • बीट यंत्रणा कुचकामी?: प्रत्येक गावाला एक ‘बीट अंमलदार’ आणि ‘पोलीस पाटील’ नेमलेला असतो. गावात होणाऱ्या अवैध धंद्यांची माहिती ठेवणे हे त्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे. मग, हद्दीत एवढी मोठी अवैध लागवड होत असताना बीट अंमलदाराचे ‘खबऱ्यांचे जाळे’ (Intelligence Network) बंद पडले होते, की सोयीस्कररित्या ‘अर्थपूर्ण’ डोळेझाक केली जात होती? हा तपासाचा विषय आहे.

  • एलसीबीला माहिती, पण ठाण्याला नाही?: जेव्हा  एलसीबीचे पथक (LCB) कारवाई करते, तेव्हा स्थानिक पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. मुक्ताईनगर पोलिसांना अंधारात ठेवून आरोपीने ही हिंमत केली, की त्याला कुणाचा ‘स्थानिक वरदहस्त’ होता? याची सखोल खातेनिहाय चौकशी होणे गरजेचे आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि एलसीबीची कामगिरी सदरची धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित आणि मुक्ताईनगरचे उपविभागीय अधिकारी सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ सुनिल दामोदरे, रफिक शेख, प्रेमचंद सपकाळे, विनोद पाटील, सलीम तडवी, पोना श्रीकृष्ण देशमुख, तसेच पोकॉ छगन तायडे, रतन गिते, मयुर निकम, रविंद्र चौधरी आणि चालक पोकॉ भरत पाटील यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!