जळगावात ‘महायुती’चाच डंका! सेनेचा १००% स्ट्राईक रेट अन् भाजपची ताकद एकवटणार?; मनपावर फडकणार भगवा!
भाजप ५३%… शिवसेना १००%! तरीही मनपेत दुय्यम भूमिका का?

जळगाव: जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत महायुतीचा डंका वाजला असला, तरी त्यातील अंतर्गत राजकीय प्रवाहाने सर्वांनाच धक्का दिला आहे. जिथे भाजपशी थेट दोन हात केले, तिथे १०० टक्के यश मिळवणाऱ्या शिवसेनेच्या (शिंदे गट) स्थानिक नेत्यांवर आता स्वपक्षातूनच प्रश्नांची सरबत्ती होत आहे. “नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपला धोबीपछाड दिली, विधानसभेला बरोबरीचे आमदार निवडून आणले, तरीही जळगाव महानगरपालिकेसाठी भाजपच्या दारात जागेचा जोगवा का?” असा तिखट सवाल आता खुद्द शिवसैनिक आणि राजकीय विश्लेषकांकडून उपस्थित केला जात आहे.
भाजपचा ५३% वि. शिवसेनेचा १००% ‘स्ट्राइक रेट’ आकडेवारी खोटे बोलत नाही. भाजपने जिल्ह्यात १५ ठिकाणी आपले उमेदवार उभे केले, त्यापैकी त्यांना ८ ठिकाणी यश मिळाले. म्हणजेच भाजपचा विजयाचा ‘स्ट्राइक रेट’ हा ५३ टक्के राहिला. याउलट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ६ ठिकाणी उमेदवार दिले आणि सहाही ठिकाणी आपला झेंडा रोवला. हा ‘स्ट्राइक रेट’ १०० टक्के आहे.
विशेष म्हणजे, चोपडा, मुक्ताईनगर, पाचोरा, भडगाव आणि अमळनेर या ठिकाणी शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून किंवा मैत्रीपूर्ण लढतीचे आव्हान स्वीकारून भाजपला पराभवाची धूळ चारली. दुसरीकडे, धरणगावात भाजपसोबत युती केली, मात्र तिथे भाजपची अपेक्षित मदत न मिळाल्याने सेनेला पराभव पत्करावा लागला. पारोळा वगळता जिथे युती केली तिथे फटका आणि जिथे ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली तिथे विजय, हे गणित स्पष्ट असतानाही स्थानिक नेते महापालिकेसाठी भाजपपुढे का झुकत आहेत, हे कोडे शिवसैनिकांना उलगडत नाही.
तुल्यबळ ताकद, मग दुय्यम भूमिका का? राजकीय ताकदीचा विचार करता जळगाव जिल्ह्यात दोन्ही पक्ष समसमान आहेत.
-
आमदार: भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे विधानसभेत समान आमदार आहेत.
-
मंत्रिपद: भाजपकडे गिरीश महाजन आहेत, तर शिवसेनेकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषवलेले गुलाबराव पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ नेते आहेत.
-
आर्थिक ताकद: दोन्ही पक्ष आर्थिकदृष्ट्या आणि संसाधनदृष्ट्या तुल्यबळ आहेत.
असे असतानाही, आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे पदाधिकारी भाजप नेत्यांकडे जागा वाढवून मिळण्यासाठी विनवण्या करत असल्याचे चित्र आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची जबाबदारी असल्याने ते जळगावात पूर्ण वेळ देऊ शकणार नाहीत, याउलट पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि चार आमदार स्वतःची ताकद पणाला लावून जळगाव मनपेचा गड स्वबळावर सर करू शकतात, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे.
सूत्र: स्वबळावर ७५ पैकी ७५ जागा जिंकण्याची क्षमता? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या अंतर्गत सर्वेक्षणात आणि कार्यकर्त्यांच्या भावनांमध्ये वेगळेच चित्र आहे. जर शिवसेनेने भाजपच्या कुबड्या न घेता स्वबळावर जळगाव मनपा निवडणूक लढवली, तर ७५ पैकी ७५ जागा निवडून आणण्याची धमक शिवसैनिकांमध्ये आहे. भुसावळ, वरणगाव, मुक्ताईनगर, चोपडा, पाचोरा आणि भडगाव येथे भाजपला बसलेला फटका हा जळगाव शहरातही पुनरावृत्ती होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे.
नगर परिषद निकालांनी हे सिद्ध केले आहे की, जळगावात भाजपला ‘जमिनीवर’ आणण्याची ताकद केवळ शिंदे गटात आहे. मात्र, वाघाची ताकद असलेल्या या पक्षाचे स्थानिक नेते जर कोल्ह्यासारखी तडजोड करणार असतील, तर त्याचा फटका भविष्यात पक्षालाच बसू शकतो. त्यामुळे वरिष्ठांनी ‘लाचारी’ सोडून ‘स्वाभिमाना’ने मैदानात उतरावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.



