राजकारण

संयमी, सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित… आपल्या हक्काचा, तरुण पिढीचा चेहरा!

विशाल भोळे - एक आश्वासक पर्व..

राजकारणात वारसाहक्काने पदे मिळतात, पण ‘लोकमान्यता’ मिळवण्यासाठी स्वकर्तृत्वच लागते. जळगाव शहराच्या राजकारणात सध्या एका युवा चेहऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे, ते म्हणजे आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांचे सुपुत्र विशाल भोळे. प्रभाग क्रमांक ७ ‘क’ मधून त्यांची झालेली बिनविरोध निवड ही केवळ एका जागेचा विजय नाही, तर जळगावच्या आगामी राजकारणात एका संयमी आणि आश्वासक नेतृत्वाचा उदय झाल्याचे संकेत आहेत.

विशाल भोळे यांची राजकारणातील एन्ट्री तशी अनपेक्षितच. महिनाभरापूर्वीपर्यंत ते निवडणुकीच्या रिंगणात असतील, असे कुणालाही वाटले नव्हते. मात्र, राजकारणात टायमिंगला महत्त्व असते. ऐनवेळी त्यांची उमेदवारी निश्चित झाली आणि समोरच्या आठ प्रतिस्पर्ध्यांनी माघार घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. आजच्या काळात, जिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एका-एका मतासाठी निकराचा संघर्ष होतो, तिथे ‘बिनविरोध’ निवडून येणे ही साधी गोष्ट नाही. हे यश निश्चितच त्यांचे वडील आमदार सुरेश भोळे यांच्या २० वर्षांच्या जनसंपर्काचे फळ आहे, पण मिळालेल्या यशानंतर विशाल भोळे यांनी जे वर्तन केले, ते त्यांच्यातील ‘नेत्या’ची ओळख करून देणारे आहे.

सहसा, तरुण रक्त आणि हाती आलेली सत्ता यांच समीकरण ‘उन्माद’ आणि ‘जल्लोष’ यात होताना दिसते. मात्र, विशाल भोळे यांनी निवड जाहीर होताच दाखवलेली प्रगल्भता वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी विजयाचा कोणताही गाजावाजा न करता सर्वप्रथम ज्यांनी माघार घेतली, त्या विरोधकांचे आभार मानले. राजकारणात विरोधकांनाही सन्मान देण्याची ही वृत्ती दुर्मिळ होत चालली आहे. “कुणाला डावलून नव्हे, तर आईच्या त्यागातून ही संधी मिळाली आहे,” ही त्यांची भावना त्यांच्यातील संस्कारांचे दर्शन घडवते. आपल्या आईने स्वतःची उमेदवारी बाजूला सारून मुलाला संधी देणे आणि मुलाने त्या त्यागाची जाणीव ठेवून जनतेसमोर जाणे, हा भावनिक धागा मतदारांना नक्कीच स्पर्श करणारा आहे.

प्रभाग ७ हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी, आता खरी कसोटी विशाल भोळे यांची असणार आहे. ‘आमदाराचा मुलगा’ हे बिरूद मिरवणे सोपे असते, पण त्याच बिरुदाखाली जनतेच्या अपेक्षांचे ओझेही तितकेच जड असते. आई-वडिलांनी २० वर्षे जो सेवेचा वसा जपला, तो पुढे नेताना विशाल यांना आधुनिक दृष्टीकोन आणि विकासाची नवी परिभाषा मांडावी लागेल.

त्यांची सुरुवात ‘बिनविरोध’ झाली असली तरी, त्यांचा पुढचा प्रवास ‘विरोध’ नसलेल्या विकासाचा असावा. त्यांच्या रूपाने जळगावला एक सुशिक्षित, संयमी आणि समजदार युवा नेतृत्व मिळाले आहे, असे म्हणायला हरकत नाही. आता प्रतीक्षा आहे ती त्यांच्या कामातून उमटणाऱ्या ठश्याची! कारण, राजकारणात एन्ट्री ‘अनपेक्षित’ असू शकते, पण यश हे ‘सातत्यपूर्ण’ कामावरच अवलंबून असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!