धरणगावच्या समृद्धीचा ‘जलसंकल्प’: २१० कि.मी. नाले खोलीकरणाचा महायज्ञ सुरू; पालकमंत्र्यांचा लोकसहभागाचा नारा
"शेतकऱ्यांच्या विहिरी आता बाराही महिने राहणार ओसंडून! पाहा काय आहे 'जलसंकल्प धरणगाव' योजना."

पाळधी / धरणगाव / जळगाव | धरणगाव तालुक्यात वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळ आणि पुराच्या दुश्चक्रावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ‘जलसंकल्प धरणगावचा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातील सुमारे २१० किलोमीटर लांबीच्या नाले व नदीपात्रांचे खोलीकरण आणि रुंदीकरण याद्वारे केले जाणार असून, हा प्रकल्प शेतीच्या भविष्याचा ‘विमा’ ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.



शेतकरी संवाद मेळाव्यातून एल्गार
पाळधी-चांदसर जिल्हा परिषद गटांतर्गत (टप्पा क्र. १) लाडली येथील फार्म हाऊस परिसरात आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर जैन इरिगेशन सिस्टीमचे चेअरमन अशोक जैन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मीनल करणवाल, डीआरडीएचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, इंफ्राचे संचालक आश्विन अग्रवाल व सर्व्हे टीमचे अरुण घाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘पालकमंत्री नाही, तर शेतकरी म्हणून संवाद’
उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना गुलाबराव पाटील भावूक झाले. ते म्हणाले, “आज मी तुमच्यासमोर मंत्री म्हणून नाही, तर एक शेतकरी म्हणून उभा आहे. पाणी हेच शेतकऱ्याचे जीवन आणि भविष्य आहे. धरणगाव तालुका पावसावर अवलंबून असल्याने पावसाळ्यात पूर आणि उन्हाळ्यात टंचाई अशा दुहेरी संकटात सापडतो. नदी-नाल्यांतील गाळामुळे पाणी साठवण क्षमता घटली आहे. हा गाळ उपसून तो शेतकऱ्यांना विनामूल्य दिला जाईल. ही ‘काळ्या आईची सेवा’ असून यामुळे जमिनीची सुपीकता वाढेल आणि भूजल पातळी सुधारून खरीप व रब्बी हंगाम शाश्वत होतील.”
प्रशासकीय आणि तांत्रिक आराखडा
व्याप्ती: तालुक्यातील २१० कि.मी. लांबीचे नाले व नदीपात्र.
कार्यपद्धती: सीएसआर (CSR) निधी आणि लोकसहभागातून अंमलबजावणी. शेतकऱ्यांवर कोणताही आर्थिक भार नाही.
स्ट्रक्चरल सुधारणा: नदीपात्रातील गाळ काढून काठांचे बळकटीकरण करणे, विद्यमान बंधारे व के.टी. वेअर (K.T. Weirs) यांची दुरुस्ती करणे आणि गरजेनुसार नवीन बंधारे उभारणे.
भविष्यकालीन योजना: बांभोरी आणि कानळदा येथे मोठ्या बंधाऱ्यांच्या मंजुरीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.

’डार्क झोन’चे संकट आणि उपाय
जिल्हा परिषद CEO मीनल करणवाल यांनी जळगाव जिल्ह्याच्या भूजल पातळीवर चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, जिल्ह्यातील अनेक भाग ‘डार्क झोन’मध्ये (अतिशोषित क्षेत्र) जात आहेत. भविष्यात बोअरवेलसाठी परवानगी मिळणे कठीण होऊ शकते, त्यामुळे अशा जलसंधारणाच्या कामात प्रशासकीय सहकार्य पूर्ण ताकदीने दिले जाईल. जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन यांनी ‘कांदाई बंधाऱ्या’चे उदाहरण देत, जलसंधारणामुळे ५ कि.मी. परिसरातील बागायती शेती कशी समृद्ध झाली, याचे महत्त्व विषद केले.
सांस्कृतिक रंगात जलजागृती
कार्यक्रमात शाहीर संग्राम जोशी आणि संदीप जोशी यांनी पालकमंत्र्यांच्या कार्यावर आणि ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ मोहिमेवर बहारदार पोवाडे सादर केले. तसेच ‘धरणगावचा जलसंकल्प – समृद्धीकडे वाटचाल’ ही माहितीपट (Documentary) दाखवण्यात आली. उपस्थित ६०० हून अधिक शेतकऱ्यांचा रुमाल, टोपी व वृक्षारोपणासाठी रोप देऊन सन्मान करण्यात आला.
उपस्थित मान्यवर
या सोहळ्याला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तालुका प्रमुख डी.ओ. पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, प्रतापराव पाटील, प्रेमराज पाटील, नंदलाल पाटील, राजेंद्र चव्हाण, सचिन पवार, जि.प. सदस्य पवन सोनवणे, दूध संघाचे संचालक रमेशआप्पा पाटील, उपजिल्हा प्रमुख रवी कापडणे, अनिल भोळे, गोपाल जीभाऊ यांच्यासह विविध गावांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांनी केले.



