दोन किलोमीटरची पायपीट अखेर थांबणार! पोखरी गावात ‘हर घर जल’चे स्वप्न साकार
कांताई बंधाऱ्यावर दोन बोअरवेलला भरघोस पाणी; ना. गुलाबराव पाटील व प्रतापराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश

पोखरी ( प्रतिनिधी): अनेक वर्षांपासून पाण्याच्या थेंबाथेंबासाठी वणवण भटकणाऱ्या आणि तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या पोखरी गावकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आणि अतीव समाधानाचा ठरला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत गावासाठी कांताई बंधारा येथे घेण्यात आलेल्या दोन नवीन बोअरवेलला (कूपनलिका) भरघोस पाणी लागले आहे. यामुळे आता पोखरी गावातील माता-भगिनींची पाण्यासाठी होणारी दोन किलोमीटरची पायपीट कायमची थांबणार असून, गावात ‘हर घर जल’चे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे.
ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न किती भयावह असतो, याचा रोजचा अनुभव पोखरी गावातील महिला आणि लहान मुले घेत होती. एका हंडा पाण्यासाठी भर उन्हात दोन-दोन किलोमीटर पायपीट करताना कित्येकांचे आयुष्य गेले. उन्हाळा सुरू झाला की गावात पाण्याचे तीव्र दुर्भिक्ष्य निर्माण होत असे. अनेकदा महिलांना रात्री-अपरात्री जीव मुठीत धरून पाणी भरण्यासाठी जावे लागत होते. पाण्यासाठीचा हा रोजचा संघर्ष गावकऱ्यांच्या पाचवीलाच पुजला होता.
या गंभीर समस्येची दखल घेत गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि युवा सेना पदाधिकाऱ्यांनी सातत्याने हा प्रश्न वरिष्ठ पातळीवर मांडला होता. अखेर या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि कार्यसम्राट प्रतापराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून, जलजीवन मिशन या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पोखरी गावासाठी कांताई बंधारा येथे दोन बोअरवेलचे काम हाती घेण्यात आले.
विशेष आनंदाची आणि भाग्याची बाब म्हणजे, या दोन्ही बोअरवेलला मोठ्या प्रमाणावर जलस्रोत (पाणी) लागला आहे. पाणी लागल्याचे पाहताच गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता आणि संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.
माता-भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरणार
या यशस्वी कामामुळे आता “हर घर जल, हर घर नल” हे शासनाचे स्वप्न पोखरी गावात वास्तवात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लवकरच प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचेल अशी आशा पल्लवित झाली आहे. गावकऱ्यांच्या मते, हे केवळ बोअरवेलचे काम नसून, गावातील माता-भगिनींच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे आणि त्यांच्या कष्टाला दिलासा देण्याचे हे एक पुण्यकर्म आहे. या सुविधेमुळे लहान मुलांचे आणि वृद्धांचे हाल थांबणार असून पोखरी गावाच्या भविष्यासाठी एक मोठा विश्वास उभा राहिला आहे.
मानले आभार
या ऐतिहासिक आणि लोकहिताच्या जलकामाबद्दल युवा सेना मागासवर्गीय तालुकाप्रमुख श्री. नवल भाऊ पारधी, सर्व ग्रामस्थ, माता-भगिनी व समस्त पोखरीकरांच्या वतीने ना. गुलाबरावजी पाटील साहेब व प्रतापरावजी पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले असून, त्यांना कोटी कोटी धन्यवाद देण्यात आले आहेत.



