बातम्या

जळगाव पोलिसांची धडक कारवाई: तब्बल २ कोटी ७२ लाखांचा १३६२ किलो गांजा खड्ड्यात गाडून नष्ट; २३ गुन्ह्यांमधील मुद्देमालाची विल्हेवाट

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल असलेल्या २३ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल २ कोटी ७२ लाख ४० हजार रुपये किमतीचा आणि १३६२ किलो वजनाचा सुका गांजा आज (दि. ११ मे) संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन

मा. सर्वोच्च न्यायालयाचे फौजदारी अपील क्र. ६५२/२०१२ मधील निर्देश, तसेच केंद्र सरकार, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (ANTF, मुंबई) यांच्या सूचनेनुसार जप्त केलेल्या अंमली पदार्थांची तात्काळ विल्हेवाट लावण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत जळगावचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांनी हा मुद्देमाल नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली.

अशी झाली कायदेशीर प्रक्रिया

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे नोडल अधिकारी श्री. राहुल गायकवाड यांनी जळगाव येथील अंमली पदार्थ केंद्रीय मुद्देमाल कक्षात जमा असलेल्या साठ्याचा सविस्तर आढावा घेतला. ज्या २३ गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन आणि कायदेशीर बाबींची पूर्तता झाली आहे, अशा १३६२ किलो सुक्या गांजाची विल्हेवाट लावण्यासाठी ‘जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समिती’कडे रीतसर प्रस्ताव सादर करण्यात आला. समितीने या प्रस्तावाची सखोल पडताळणी करून मुद्देमाल नष्ट करण्यास कायदेशीर मान्यता दिली.

पर्यावरणाची काळजी घेत खड्ड्यात गाडला गांजा

समितीची मान्यता मिळाल्यानंतर आज दिनांक ११ मे २०२६ रोजी सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत ही नाश प्रक्रिया पार पडली. जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या इमारतीमागील मोकळ्या जागेत एक मोठा खड्डा खोदून त्यात हा २ कोटी ७२ लाखांचा गांजा पुरण्यात आला. गांजा जाळल्यास होणारे प्रदूषण टाळण्यासाठी व पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल या उद्देशाने खड्डा खोदून गांजा नष्ट करण्याचा पर्यावरणपूरक निर्णय घेण्यात आला. पारदर्शकतेसाठी या संपूर्ण प्रक्रियेचे पंचांसमक्ष व्हिडिओ चित्रीकरण देखील करण्यात आले आहे.

या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली कारवाई

ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ‘जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समिती’च्या देखरेखीखाली झाली. यावेळी समितीचे सदस्य अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रदिप ठाकूर, कृषी विभागाचे प्रतिनिधी विकास बोरसे, तसेच वजन व मापे विभागाचे निरीक्षक राजेंद्र व्यवहारे हे प्रत्यक्ष उपस्थित होते.

​स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय दोरकर, पोलीस हवालदार संदीप पाटील, जयंत चौधरी, अजय पाटील आणि रवींद्र चौधरी यांनी ही संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.

​जळगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांना मोठा दणका बसला असून, जिल्ह्याला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलिसांचे हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!