जळगाव विधान परिषद निवडणूक: महायुतीत रस्सीखेच; पण अफाट जनसंपर्क आणि विकासकामांच्या जोरावर प्रतापराव पाटीलच प्रबळ दावेदार!

जळगाव (विशेष राजकीय प्रतिनिधी): महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी अखेर निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. १८ जून २०२६ रोजी मतदान आणि २२ जून रोजी मतमोजणी होणार असल्याने जळगाव जिल्ह्यात तात्काळ आचारसंहिता लागू झाली आहे. माजी आमदार चंदूभाई पटेल यांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या या जागेवर महायुतीचा झेंडा फडकणार हे निश्चित असले तरी, उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सध्याचे संख्याबळ आणि जिल्ह्याचे बदललेले राजकीय समीकरण पाहता, ही जागा शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) वाट्याला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यातही जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र आणि माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांचे नाव सर्वात आघाडीवर असून, त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे आणि तळागाळातील कामांमुळे त्यांनाच उमेदवारी मिळायला हवी, अशी आक्रमक मागणी कार्यकर्त्यांमधून जोर धरू लागली आहे.
मतदार कोण? काय आहे परिस्थिती?
या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती सध्या अस्तित्वात नाहीत. त्यामुळे केवळ नवनियुक्त नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिकेचे नगरसेवक तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष हेच या निवडणुकीचे ‘किंगमेकर’ असणार आहेत. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असले तरी, भाजपा आणि शिवसेनेत उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे.
भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी, पण एकमुखी चेहरा नाही!
या जागेवर भाजपकडून पारंपरिक हक्क सांगितला जात असला तरी, त्यांच्याकडे इच्छुकांची मोठी रांग लागली आहे. नंदकुमार अडवाणी, माजी जि.प. सदस्य नंदकिशोर महाजन आणि अमोल शिंदे यांच्या नावाची चर्चा असतानाच, आता माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांनीही शर्यतीत उडी घेतली आहे. या अंतर्गत स्पर्धेमुळे भाजपमध्ये एकवाक्यता नाही, याचा फटका निवडणुकीत बसू शकतो. अशा स्थितीत महायुतीला एका सर्वसंमत आणि ‘इलेक्शन मेरिट’ असलेल्या चेहऱ्याची गरज आहे.
प्रतापराव पाटील का आहेत ‘परफेक्ट’ उमेदवार?
दुसऱ्या बाजूला शिवसेनेने या जागेसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. प्रतापराव पाटील यांच्या रूपाने शिवसेनेकडे एक तरुण, अभ्यासू आणि प्रचंड जनसंपर्क असलेला नेता आहे. प्रतापराव पाटील यांना उमेदवारी का मिळायला हवी, याची काही ठळक कारणे खालीलप्रमाणे आहेत:
१. अफाट जनसंपर्क: प्रतापराव पाटील हे केवळ पालकमंत्र्यांचे सुपुत्र नाहीत, तर त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्यात तरुणांची मोठी फळी त्यांच्या पाठीशी उभी आहे. प्रत्येक तालुक्यात आणि गावात त्यांचा थेट संपर्क आहे.
२. जि.प. सदस्य म्हणून धडाकेबाज कामगिरी: जिल्हा परिषदेचे सदस्य असताना त्यांनी मतदारसंघातील रस्ते, पाणी आणि आरोग्याचे प्रश्न मार्गी लावले. प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे.
३. संकटकाळातील धावून जाणारा नेता: कोरोना काळ असो वा जिल्ह्यात आलेली अतिवृष्टी, प्रतापराव पाटील नेहमीच जनतेच्या बांधावर आणि मदतीला तत्पर दिसले आहेत.
४. नगरसेवकांशी थेट नाळ: या निवडणुकीतील मतदार हे नगरसेवक आहेत. जिल्ह्यातील अनेक नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगरसेवकांचे वैयक्तिक आणि प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रतापरावांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे नगरसेवकांचा त्यांच्यावर मोठा विश्वास आहे.
५. विजयाची खात्री: शिवसेनेने यापूर्वी या मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवली आहे. ‘तिसऱ्यांदा शिवसेना’ हा नारा सार्थ करण्यासाठी प्रतापराव पाटील यांच्यासारखा ‘विनिंग कॅंडिडेट’ महायुतीला देणे गरजेचे आहे.
असे आहे महायुतीचे ‘विजयाचे गणित’
नगरपालिका / नगरपरिषदा / नगरपंचायती (एकूण ४८२ जागा):
भाजपा – १७१
शिवसेना (शिंदे गट) – १२०
राष्ट्रवादी (अजित पवार गट) – ३३
(महायुतीकडे स्पष्ट बहुमत)
इतर: काँग्रेस (२१), राकाँ-शरद पवार (२४), ठाकरे गट (३), एमआयएम (३).
जळगाव महानरपालिका (७५ जागा):
भाजपा – ४६
शिवसेना – २२
ठाकरे गट – ५, राष्ट्रवादी – १, अपक्ष – १.
अपक्ष आणि आघाड्यांची गोळाबेरीज: प्रतापरावांसाठी जमेची बाजू
वरवर पाहता भाजपचे संख्याबळ जास्त दिसत असले तरी, खरा खेळ अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांच्या हातात आहे. जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र जन विकास आघाडी (१५), धरणगांव शहर विकास आघाडी (९), अमळनेर तालुका शहर विकास आघाडी (१२), शहर विकास आघाडी (१०), शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडी (२), जन आधार विकास पार्टी (३), सुराज्य परिवर्तन (२) आणि तब्बल ५४ अपक्ष नगरसेवक आहेत.
हे सर्व अपक्ष आणि आघाड्यांचे नगरसेवक ना. गुलाबराव पाटील आणि प्रतापराव पाटील यांच्या थेट संपर्कात आहेत. विकासकामांसाठी निधी आणण्याच्या बाबतीत या सर्व स्थानिक आघाड्यांना प्रतापराव पाटील नेहमीच मदत करत आले आहेत. जर प्रतापरावांना उमेदवारी मिळाली, तर या सर्व आघाड्या आणि अपक्षांची १००% मते शिवसेनेच्या पारड्यात पडतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नगरसेवकही महायुतीचा धर्म पाळत शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे राहतील.
थोडक्यात सांगायचे तर: भाजपमधील गटबाजी आणि इच्छुकांची भाऊगर्दी पाहता, तिथे उमेदवारी दिल्यास क्रॉस व्होटिंगचा धोका संभवतो. याउलट, प्रतापराव पाटील यांना उमेदवारी दिल्यास शिवसेनेची हक्काची मते, भाजप-राष्ट्रवादीची साथ आणि सर्व स्थानिक आघाड्या/अपक्षांचे समर्थन मिळून महायुतीचा विजय विक्रमी मतांनी होऊ शकतो. त्यामुळे जळगाव विधान परिषदेची उमेदवारी प्रतापराव पाटील यांनाच मिळायला हवी, हीच जिल्ह्याची राजकीय गरज बनली आहे!



