बातम्या

जळगावात विधान परिषदेच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये ‘महाभारत’! निष्ठावंतांमध्ये संताप; बंडखोरीच्या भीतीने शिंदेसेनेच्या आशा पल्लवित

जळगाव (विशेष प्रतिनिधी): स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे पडघम आता जोरकसपणे वाजू लागले आहेत. या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, जळगाव जिल्ह्यातील भाजपमध्ये उमेदवारीच्या शर्यतीवरून मोठा ‘गृहकलह’ चव्हाट्यावर आला आहे. उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याआधीच नेत्यांमधील कुरघोडीच्या राजकारणामुळे पक्षात अंतर्गत नाराजीचे फटाके फुटू लागले आहेत. भाजपमधील या वाढत्या गटबाजीचा थेट फायदा उठवण्याच्या तयारीत शिवसेना (शिंदे गट) असून, त्यांनी या जागेवर प्रबळ दावा ठोकण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामुळे जळगावचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

निष्ठावंत विरुद्ध आयाराम आणि बंडखोर असा संघर्ष

सध्या भाजपच्या गोटातून विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी जी नावे आघाडीवर आहेत, त्यावरूनच पक्षात मोठा वाद आणि असंतोष निर्माण झाला आहे. विशेषतः अमोल शिंदे आणि डॉ. केतकी पाटील यांच्या नावांमुळे भाजपचे जुने कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

अमोल शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षाच्या आदेशाला झुगारून थेट भाजपसोबत दोन वेळा बंडखोरी केली होती आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात शड्डू ठोकला होता. अशा ‘बंडखोराला’ आता विधान परिषदेची उमेदवारी देऊन थेट बक्षीसी का दिली जात आहे? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. दुसरीकडे, नुकत्याच काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये दाखल झालेल्या डॉ. केतकी पाटील यांचे नावही उमेदवारीसाठी चर्चेत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून ऊन-पावसाची तमा न बाळगता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन एकनिष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची भावना पक्षात निर्माण झाली आहे. वारंवार बंडखोरी करणाऱ्यांना आणि ऐनवेळी पक्षात आलेल्या ‘आयारामांना’ थेट संधी दिली जाणार असेल, तर आम्ही काम कोणासाठी करायचे? असा उद्विग्न प्रश्न भाजपच्या जुन्या आणि निष्ठावंत फळीकडून विचारला जात आहे.

इतर दिग्गजांच्या नावांनाही अंतर्गत विरोध

नाराजी केवळ आयाराम किंवा बंडखोरांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. विधान परिषदेसाठी चर्चेत असलेल्या पक्षातील जुन्या नेत्यांच्या मार्गातही अनेक अडथळे आहेत. नंदकुमार अडवाणी आणि नंदकिशोर महाजन या ज्येष्ठ नेत्यांच्या नावांनाही पक्षातीलच एका प्रबळ गटाने तीव्र विरोध दर्शवला आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी विविध नेत्यांकडून अंतर्गत पातळीवर एकमेकांचे पाय खेचण्याचे आणि जोरदार कुरघोडीचे राजकारण सुरू आहे.

‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांच्या भूमिकेकडे लक्ष

जळगाव जिल्हा हा राज्याचे मंत्री आणि भाजपचे संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला आहे. उमेदवारीवरून पक्षात सुरू असलेल्या या अंतर्गत यादवीवर गिरीश महाजन यांनी अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत. सध्यातरी भाजपमध्ये ‘वेट अँड वॉच’ची परिस्थिती असून, महाजन साहेब यातून काय मार्ग काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या अनिर्णित अवस्थेमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

…तर भाजपची गटबाजी शिंदेसेनेच्या पथ्यावर!

भाजपमध्ये सुरू असलेल्या या भयंकर गटबाजीवर आणि कुरघोड्यांवर महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने अत्यंत बारीक लक्ष ठेवले आहे. जळगावमधील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवर शिंदे गटाने आधीच आपला दावा ठोकला आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत.

जर भाजपमधील अंतर्गत गटबाजी अशीच उफाळत राहिली आणि एकमेकांच्या उमेदवारांना विरोध करण्याची मालिका सुरूच राहिली, तसेच कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठींना अपयश आले, तर या संपूर्ण गोंधळाचा थेट फायदा शिंदे गट घेण्याची दाट शक्यता आहे. “तुमच्याकडे उमेदवारीवरून वाद आहेत, त्यामुळे ही जागा आम्हाला सोडा,” असा युक्तिवाद करत शिंदे गट पूर्ण ताकदीने पुढे येऊ शकतो. असे झाल्यास, ना. गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची मोठी संधी निर्माण होऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!