केंद्रात-राज्यात ‘डबल’ आता महापालिकेत ‘तिसरे इंजिन’ जोडा; आमदार राजूमामा भोळे यांचे आवाहन; जळगावात महायुतीचा ‘वचननामा’ प्रकाशित
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रचाराचा धडाकेबाज प्रारंभ; गिरीश महाजनांचा ७५ जागा जिंकण्याचा दावा

जळगाव: “जळगावच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी केंद्रात आणि राज्यात जसे ‘डबल इंजिन’ सरकार आहे, तसे आता महापालिकेत महायुतीचे ‘तिसरे इंजिन’ जनतेने जोडावे,” असे खणखणीत आवाहन आमदार राजूमामा भोळे यांनी केले. महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, महायुतीने आज पिंप्राळा भागातील ऐतिहासिक भवानी माता मंदिर परिसरातून आपल्या प्रचाराचा झंझावात सुरू केला.
भारतीय जनता पक्षातर्फे महायुतीचा भव्य मेळावा रविवारी, दि. ४ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता पिंप्राळा बाजार मैदानात उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर महायुतीची अभूतपूर्व एकजूट आणि दिग्गज नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली.
विकसित भारतासाठी साथ द्या: रवींद्र चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, “जळगावात चांगला प्रतिसाद पाहता महायुती जोरदार निवडून येणार, यामध्ये मला काही शंका नाही. २०४७ ला एक विकसित भारत म्हणून आपल्याला पाऊल उचलायचे आहे. त्यासाठी महायुतीचे नेते जोरदार प्रयत्न करीत असून, त्यासाठी आपली साथ हवी आहे.”
७५ जागा जिंकणारच: गिरीश महाजन राज्याचे संकटमोचक व मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या आक्रमक शैलीत विरोधकांना इशारा दिला. “जळगावात महायुतीची लाट असून, आम्ही सर्व ७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मान्यवरांची उपस्थिती यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, खा. स्मिताताई वाघ, आ. मंगेश चव्हाण, आ. राजूमामा भोळे, आ. किशोर आप्पा पाटील, आ. अमोल जावळे, राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख संजय पवार उपस्थित होते.
वचननामा आणि सत्कार सुरुवातीला बिनविरोध निवडून आलेल्या महायुतीच्या १२ नगरसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. त्यानंतर जळगावच्या विकासाचा ध्यास घेतलेला महायुतीचा ‘वचननामा’ मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.
बंडखोरांनी तलवारी म्यान केल्या; उमेदवारांना पाठिंबा या मेळाव्यात अनेक ठिकाणी बंडखोरी शमवण्यात नेत्यांना यश आले. प्रसंगी काही उमेदवारांनी महायुतीला जाहीर पाठिंबा दिल्याची माहिती सूत्रसंचालक विशाल त्रिपाठी यांनी दिली:
-
१३ ब: सुरेखा तायडे यांना अपक्ष व भाजप कार्यकर्ते प्रिया विनोद तायडे यांनी पाठिंबा दिला.
-
१० ड: जाकीर खान पठाण यांना शेख अहमद नूर (अपक्ष) यांनी पाठिंबा दिला.
-
१० क: कविता शिवदे यांना अपक्ष नीलूताई संजय इंगळे यांनी पाठिंबा दिला.
-
८ क: भाजप बंडखोर माजी नगरसेवक विजय पाटील यांनी अमर जैन यांना पाठिंबा दिला.
-
१६ क: रंजना वानखेडे यांना शिवसेनेचे कार्यकर्ते व अपक्ष उमेदवार मीनल हर्षल मावळे यांनी पाठिंबा दिला.
-
९ ड: डॉ. चंद्रशेखर पाटील यांना राज कोळी यांनी जाहीर पाठिंबा दिला.
पक्षांतर आणि विजयाची शपथ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. चव्हाण यांनी सर्वांना भगवा गमछा देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी महायुतीच्या सर्व उमेदवारांनी प्रदेशाध्यक्षांचा सत्कार करून विजयाची शपथ घेतली.
तिन्ही पक्ष एका विचाराने: गुलाबराव देवकर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते गुलाबराव देवकर म्हणाले की, “जळगावच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी आम्ही तिन्ही पक्ष एका विचाराने निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत.”
प्रचाराचा शुभारंभ मेळाव्याच्या आधी भवानी माता मंदिर येथे दर्शन घेऊन आणि नारळ फोडून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा अधिकृत प्रारंभ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच पिंप्राळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी आ. किशोर आप्पा पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनीही जोरदार भाषणे करून महायुतीला निवडून देण्याचे आवाहन केले. या भव्य सभेला कार्यकर्त्यांची अलोट गर्दी उसळली होती, ज्यामुळे परिसरात महायुतीचे मोठे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. आभार प्रदेश सरचिटणीस नितीन इंगळे यांनी मानले.



