जळगाव मनपा रणसंग्राम: महायुतीचा ‘धर्म’ आणि भाजपचा ‘वरणगाव पॅटर्न’; पुनरावृत्ती जळगाव मनपात होणार का?
वरणगाव पॅटर्नची पुनरावृत्ती जळगाव मनपात होणार का?

जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. ७५ जागांसाठी होणारा हा सामना वरकरणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ दिसत असला, तरी प्रत्यक्षात तो किती ‘सरळ’ असेल, याबाबत राजकीय जाणकारांमध्ये साशंकता आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष ‘महायुती’ म्हणून एक दिलाने सामोरे जात असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. परंतु, जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सध्या जे वारे वाहत आहेत आणि नुकताच झालेला ‘वरणगाव नगरपरिषदेचा’ जो अनुभव आहे, ते पाहता महानगरपालिकेत ‘मैत्रीपूर्ण लढतीं’च्या नावाखाली वेगळीच राजकीय खेळी खेळली जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
राजकारणात ‘दिसते तसे नसते’ आणि नेमके हेच सूत्र सध्या जळगावमध्ये भाजपच्या ‘मिशन ६० प्लस’साठी वापरले जात असल्याची चर्चा आहे. महायुती धर्माचे पालन करताना जागावाटपाच्या गणितात भाजपला मर्यादित जागांवर समाधान मानावे लागू शकते. मात्र, बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी केवळ वाट्याला आलेल्या जागा पुरेशा नाहीत, हे भाजपच्या धुरिणांना पक्के ठाऊक आहे. त्यामुळेच, जागावाटपात ज्या जागा मित्रपक्षांना सुटतील, तिथे बंडखोरीचे अस्त्र उगारले जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
येथे ‘वरणगाव पॅटर्न’चा उल्लेख करणे अपरिहार्य ठरते. वरणगावमध्ये काय घडले? अधिकृत उमेदवारासमोर अपक्ष उमेदवार उभा राहिला, त्याने पक्षाच्या उमेदवाराला जोरदार टक्कर देत विजय मिळवला आणि विजयानंतर सोयीस्करपणे पुन्हा मूळ पक्षात प्रवेश केला किंवा पाठिंबा दिला. जळगाव महानगरपालिकेत जर याच रणनीतीची पुनरावृत्ती झाली, तर आश्चर्य वाटायला नको. राजकीय वर्तुळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वॉर्डांमध्ये “तुम्ही लढा, आम्ही आहोत,” असा छुपा संदेश बंडखोरांना दिला जात असल्याची कुजबूज आहे.
या रणनीतीचा सर्वाधिक फटका शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बसू शकतो. महायुती म्हणून अधिकृत तिकीट मिळाले, तरी समोर उभा राहणारा ‘अपक्ष’ हा केवळ नावापुरता अपक्ष नसून, त्याला पडद्यामागून रसद पुरवली जात असेल, तर ही लढाई असमान ठरेल. जर निकालानंतर पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडून आलेल्या उमेदवारांपेक्षा, ‘विशिष्ट पक्षाशी’ निष्ठा सांगणाऱ्या अपक्षांची संख्या जास्त निघाली, तर तो जळगावच्या राजकारणातील एक ‘मास्टरस्ट्रोक’ असेलही, पण तो युतीधर्माला नख लावणारा प्रकार ठरेल.
त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की, येणारी निवडणूक ही पक्षांची असेल की ‘प्रायोजित’ अपक्षांची? भाजपची ही संभाव्य रणनीती ओळखून शिवसेना आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व वेळीच सावध होणार का? की विजयाच्या गुढ्यात अडकून स्वतःचेच राजकीय नुकसान करून घेणार?
शेवटी, लोकशाहीत जनता जनार्दन सर्वोच्च आहे. उमेदवार अधिकृत असो वा बंडखोर, मतदार राजा कोणाच्या पारड्यात वजन टाकतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पण एक नक्की, जळगाव मनपा निवडणूक ही केवळ सत्तेची नाही, तर राजकीय विश्वासार्हतेची कसोटी पाहणारी ठरणार आहे.



