जळगावात धक्का! राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याला मध्यरात्री अटक
कायद्याची पकड! जीवे मारण्याच्या धमकीच्या गुन्ह्यात मोठी कारवाई

जळगाव श्री मराठी न्युज । २४ सप्टेंबर २०२५ जळगाव शहराच्या राजकीय वातावरणाला हादरा देणारी धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे स्थानिक पदाधिकारी विनोद पंजाबराव देशमुख यांना तीन वर्षांपूर्वी दाखल झालेल्या प्रकरणात अखेर मध्यरात्री अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी शहरातील व्यावसायिक मनोज लिलाधर वाणी यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. या घटनेत दरोडा, मारहाण तसेच जीवे मारण्याच्या धमकीसारख्या गंभीर आरोपांची नोंद झाली होती. तक्रारीच्या आधारे १२ नोव्हेंबर २०२२ रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास दीर्घकाळ सुरू राहिल्यानंतर अखेर मंगळवारी (२३ सप्टेंबर २०२५) रात्री उशिरा रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने कारवाई करत देशमुख यांना अटक केली. ही अटक रात्रीच्या सुमारास झाल्याने संपूर्ण शहरात राजकीय चर्चांना चांगलाच ऊत आला आहे.
देशमुख यांच्या अटकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. विरोधकांनी यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली असून, आगामी काळात या घटनेचे राजकीय परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून, अटक केलेल्या विनोद देशमुख यांना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती पोलिसांनी दिली आहे.



