दरोड्याचा थरार: चाळीसगांव-कन्नड रोडवरील गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; १० आरोपी निष्पन्न!
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने LCB ची धडक कारवाई, १.२० लाखांच्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न!

चाळीसगांव (जळगांव): दि. २६/१०/२०२५ रोजी चाळीसगांव ते कन्नड रोडवरील नायरा पेट्रोलपंपाच्या पाठीमागे, फिर्यादी योगेश नेताजी पाटील (रा. पाचोरा, ता. जि. जळगांव) आणि त्यांच्या पत्नी व नातेवाईकांना अडवून त्यांच्यावर काठीने हल्ला करत जबरीने दरोडा टाकणाऱ्या ७ ते ८ अनोळखी इसमांचा छडा लावण्यात जळगांव स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती, मात्र पोलिसांनी जलद आणि कसून तपास करत एकूण १० आरोपींना निष्पन्न केले आहे.
फिर्यादी योगेश पाटील हे त्यांची चारचाकी घेऊन पुणे येथे जात असताना, चाळीसगांव ते कन्नड रोडवर नायरा पेट्रोलपंपाजवळ काहीतरी अवजड वस्तू रस्त्यावर फेकून त्यांच्या वाहनाला थांबवण्यात आले. या संधीचा फायदा घेत, ७ ते ८ अज्ञात दरोडेखोरांनी फिर्यादी आणि त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना काठीने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल फोन आणि नगदी रक्कम असा एकूण ₹ १,२०,०००/- (एक लाख वीस हजार रुपये) किंमतीचा मुद्देमाल जबरीने लुटून नेला होता. या घटनेनंतर चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुरनं. ३३७/२०२५ भा. न्या. संहिता कलम ३१० (२), ३०९(६), ३२४ (४) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, मा. श्री. डॉ. महेश्वर रेड्डी, सो. पोलीस अधीक्षक, जळगांव, मा. श्रीमती कविता नेरकर, सो. अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगांव परिमंडळ आणि मा.श्री विजयकुमार ठाकुरवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगांव उपविभाग यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले.त्यानुसार, मा. श्री राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांच्या नेतृत्वाखाली, पोउपनि. सोपान गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले.

या पथकाने अविरतपणे ६ दिवस अहोरात्र मेहनत घेतली. तांत्रिक माहितीचा आधार घेत तसेच चाळीसगांव ते नांदगांव आणि नांदगाव येथून शिरुड बंगला मार्गे छत्रपती संभाजी नगरपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. या कसून तपासणीनंतर आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला ट्रक क्र. MH १२ KP ५९२५ निष्पन्न झाला.
ट्रक मालकासह पोलिसांनी खालील १० आरोपींची ओळख पटवून त्यांना निष्पन्न केले आहे: १. अर्जुन बालाजी शिंदे २. अशोक हिरामण शिंदे ३. शंकर शिवाजी पवार ४. सुनिल हिरामण शिंदे ५. राहुल अनिल काळे ६. छगन महादेव काळे ७. श्विरे अंकुश पवार ८. राहुल अनिल शिंदे ९. संजय रामा काळे १०. रामा सुबराव काळे (ट्रक मालक) (सर्व रा. लक्ष्मी पारधी पेढी तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव)
या आरोपींनी ट्रक क्र. MH १२ KP ५९२५ चा वापर करून धाराशिव जिल्ह्यातील मुरुम पोलीस स्टेशन हद्दीत देखील अशाच प्रकारचा गुन्हा केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांच्याकडून मिळाली आहे. त्यानुसार, धाराशिव पोलिसांनी यातील आरोपी नामे १) अर्जुन बालाजी शिंदे आणि २) अशोक हिरामण शिंदे यांना मुरुम पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यात अटक केली आहे.
चाळीसगांव ग्रामीण पोलीस या अटक आरोपींचा प्रोड्युस वॉरंट घेऊन त्यांना ताब्यात घेणार आहेत. तर, गुन्ह्यातील उर्वरित फरार आरोपींचा कसून शोध सुरू असून, त्यांना लवकरच अटक करून पुढील कायदेशीर तपास करण्यात येईल, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
मा.श्री. डॉ. महेश्वर रेड्डी, सो. पोलीस अधीक्षक, जळगांव, मा. श्रीमती कविता नेरकर, सो. अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगांव परिमंडळ व मा.श्री विजयकुमार ठाकुरवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगांव, उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड, पोउपनि. सोपान गोरे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, सलीम तडवी, पोकों/भुषण शेलार, महेश पाटील, भुषण पाटील, सागर पाटील, मयुर निकम, सचिन घुगे, सिध्देश्वर डापकर, रतनहरी गिते, ईश्वर पाटील, प्रदिप सपकाळे, गौरव पाटील, मिलींद जाधव चापोकॉ बाबासाहेब पाटील स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या यशस्वी कारवाईमुळे प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.



