माजी खासदार उन्मेष पाटलांच्या अडचणीत वाढ?; देवगिरी बँकेची ५.३३ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
गहाण ठेवलेली मशिनरी विकल्याचा गंभीर आरोप; मंत्री गिरीश महाजन यांच्या आरोपानंतर तीनच दिवसात कारवाई?

श्री मराठी न्युज, जळगाव | दि. ११ नोव्हेंबर | शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेची तब्बल ५ कोटी ३३ लाख ८५ हजार ३५६ रुपयांची फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपावरून, उन्मेष पाटील यांच्यासह एकूण चार जणांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बँकेचे चाळीसगाव शाखा व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी फिर्याद दिली आहे. उन्मेष पाटील यांच्यासह संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
फिर्यादीनुसार, ‘उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या नावाने देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या चाळीसगाव शाखेतून औद्योगिक कर्ज घेण्यात आले होते. मात्र, हे कर्ज वेळेत न भरल्याने ते थकीत (NPA) झाले. बँकेकडून कर्जफेडीसाठी संधी देऊनही परतफेड झाली नाही, त्यामुळे बँकेने कर्ज वसुलीसाठी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली.
या प्रक्रियेदरम्यान, कर्जासाठी बँकेकडे जी मशिनरी तारण (गहाण) ठेवण्यात आली होती, ती मशिनरी कंपनीच्या संचालकांनी बँकेची परवानगी न घेता, संगनमताने विकून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. बँकेची मालमत्ता परस्पर विकून फसवणूक केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. याच आधारावर, चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी उन्मेष पाटील यांच्यासह चौघांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ
या गुन्ह्याला राजकीय पार्श्वभूमीदेखील जोडली जात आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच मंत्री गिरीश महाजन आणि उन्मेष पाटील यांच्यात एका भूखंड प्रकरणावरून जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. त्यावेळी झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी, “उन्मेष पाटील यांनी स्टेट बँकेसह अन्य एका बँकेलाही गंडवल्याचा,” असा जाहीर आरोप केला होता.
महाजन यांनी हा आरोप केल्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत उन्मेष पाटील यांच्यावर हा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने, या प्रकरणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्याने, हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.



