DYSP गणापुरे पथकाचं ऑपरेशन यशस्वी!गोळीबार प्रकरणी दोन जणांना अटक

जळगाव (प्रतिनिधी): शनीपेठ परिसरात घडलेल्या गोळीबार प्रकरणात मयत आकाश उर्फ (टपऱ्या) युवराज बाविस्कर (वय २८, रा. कांचननगर) याच्या मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे (वय २५, रा. कांचननगर) आणि त्याचा साथीदार करण पाटील (वय २५, रा. कुसुंबा, ता. जळगाव) या दोघांना पोलिसांनी अखेर अटक केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून हे दोघे आरोपी पसार होते. परंतु उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांना त्यांच्या हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी विशेष पथक तयार केले. त्यात सहायक फौजदार कैलास सोनवणे, पोहेकॉ रवी जाधव, पोहेकॉ अशोक फुसे आणि पोहेकॉ आवेश शेख या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.हे पथक तत्काळ डीमार्ट परिसरात रवाना झाले आणि मध्यरात्री सुमारे १२:४६ वाजता या दोन्ही आरोपींना अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले. या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
स्थानिक पोलिसांना आणि संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना गोळीबार प्रकरणातील आरोपींना पकडण्यात वारंवार अपयश आले होते. या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी स्वतः पुढाकार घेत, स्वतंत्र पथक तयार करून ही धडक कारवाई केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्री डीमार्ट परिसरात अत्यंत शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना बुधवारी (दि. १२ नोव्हेंबर) न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद मान्य करत दि. १७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.दरम्यान, या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपी डोया सपकाळे याचा परिसरात दहशतीचा कारभार होता, अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास जोरात सुरू आहे.



