बातम्या

बोदवडचा व्यावसायिक अडकला; सायबर भामट्यांनी ४४ लाखांना लुटले

करिश्मा मिश्रा, डेव्हिडसन लिंडा आणि तोतया कस्टम अधिकाऱ्यांचा प्रताप; तिघे व्हॉट्सॲप नंबर पोलिसांच्या रडारवर

जळगाव, (दि. १४): ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष आणि दिल्ली विमानतळावर अडकलेल्या व्यक्तीला सोडवण्याचा बनाव रचून सायबर गुन्हेगारांनी बोदवड येथील एका बांधकाम व्यावसायिकाची तब्बल ४४ लाख ५ हजार ७६५ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन मोबाईल क्रमांक रडारवर घेतले आहेत.

नेमकी घटना काय? फिर्यादी नितीन रमेश चव्हाण (वय ३७, व्यवसाय- बांधकाम, रा. भुसावळ रोड, बोदवड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना १ सप्टेंबर २०२५ ते ८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडली. सुरुवातीला ‘करिश्मा मिश्रा’ नावाच्या महिलेने तिच्या ८१२१८७५५३४ या व्हॉट्सॲप क्रमांकावरून चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. तिने त्यांना “DGM Share Trading” (DGM शेअर ट्रेडिंग) या ॲपवर गुंतवणूक करण्यास भाग पाडले आणि त्या बदल्यात मोठ्या नफ्याचे खोटे आश्वासन दिले.

कस्टम आणि बँक अधिकाऱ्यांचा बनाव गुंतवणूक सुरू असतानाच सायबर भामट्यांनी फसवणुकीचा दुसरा अंक सुरू केला. “Devidson Linda” (डेव्हिडसन लिंडा) नावाची व्यक्ती दिल्ली एअरपोर्टवर अडकली असून, तिच्या सुटकेसाठी पैशांची मागणी करण्यात आली. यासाठी एका तोतया महिला कस्टम अधिकाऱ्याने तिच्या ८११९०६१९०० या व्हॉट्सॲप क्रमांकावरून, तर एका तोतया बँक अधिकाऱ्याने ९२११९६०४२० या व्हॉट्सॲप क्रमांकावरून चव्हाण यांच्याशी संपर्क साधला.

या भामट्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन रकमा स्वीकारल्या. अशा प्रकारे चव्हाण यांची एकूण ४४ लाख ५ हजार ७६५ रुपयांची फसवणूक करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चव्हाण यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सतिष गोराडे (PI Satish Gorade) पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!