बातम्या

रक्षकच बनला भक्षक! होमगार्डच्या घरात चालणाऱ्या कुंटणखान्याचा पर्दाफाश; पती-पत्नीवर गुन्हा दाखल

AHTU च्या योगिता नारखेडे यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई

चोपडा/जळगाव: चोपडा तालुक्यातील धानोरा येथे कायद्याचे रक्षण करणाऱ्या होमगार्डनेच आपल्या घरात वेश्याव्यवसाय (कुंटणखाना) थाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगाव येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (AHTU) प्रमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे आणि त्यांच्या पथकाने धाडसत्र राबवत या कुंटणखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय? चोपडा तालुक्यातील धानोरा गावात एका घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती जळगावच्या मानवी तस्करी विरोधी पथकाला (AHTU) मिळाली होती. विशेष म्हणजे, ज्या घरात हा प्रकार सुरू होता, ते घर एका होमगार्डचे असल्याचे समजले. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी एक योजना आखली.

असा रचला सापळा: पोलिसांनी खात्री करण्यासाठी एका बनावट ग्राहकाला (डमी ग्राहक) संबंधित होमगार्डच्या घरी पाठवले. तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री होताच, त्या डमी ग्राहकाने बाहेर दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाला इशारा केला. इशारा मिळताच पथकाने सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक धाड टाकली आणि या कुंटणखान्याचा पर्दाफाश केला.

पीडितेची सुटका आणि आरोपींची माहिती: या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून एका पीडित महिलेची सुटका केली. तपासात असे उघड झाले की, संशयित आरोपी हे पीडित महिलेला बळजबरीने घरी आणून, तिच्या इच्छेविरुद्ध तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत होते आणि तिच्या कमाईवर आपली उपजीविका करत होते.

आरोपींची नावे: १. चंद्रकांत सुपडू सोनवणे (वय ४५, रा. धानोरा, ता. चोपडा) – हा आरोपी होमगार्ड म्हणून कार्यरत आहे. २. शिला चंद्रकांत सोनवणे (वय ४२, रा. धानोरा, ता. चोपडा) – आरोपीची पत्नी.

एकीकडे जिल्ह्याचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) गोपनीय माहितीच्या आधारे धडाकेबाज कारवाई करते, आणि दुसरीकडे ज्यांच्या हद्दीत हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे, त्या स्थानिक अडावद पोलिसांना याची भनकही लागत नाही, हा प्रकार नक्की कशाचे द्योतक आहे?

‘दिव्याखाली अंधार’ आणि खाकीला डाग: ज्या होमगार्डवर (चंद्रकांत सोनवणे) कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी आहे, तोच आपल्या राहत्या घरात सर्रासपणे कुंटणखाना चालवतो, पीडित महिलांकडून देहविक्री करून घेतो, ही बाब पोलीस खात्यासाठी अत्यंत लज्जास्पद आहे. पण त्याहून गंभीर बाब म्हणजे, हा होमगार्ड पोलीस यंत्रणेचाच एक भाग असूनही, त्याच्या या काळ्या धंद्याची माहिती त्याच्यासोबत काम करणाऱ्या स्थानिक पोलिसांना किंवा बीट हवालदारांना असू नये, हे न पचणारे आहे.

AHTU ला माहिती मिळते, पण स्थानिकांना का नाही? जळगाव मुख्यालयी बसलेल्या AHTU च्या सपोनि योगिता नारखेडे आणि त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळते, ते सापळा रचतात आणि कारवाई करतात. मग, रोज त्याच गावात गस्त घालणाऱ्या, त्याच लोकांमध्ये वावरणाऱ्या स्थानिक पोलिसांचे ‘खबरी’ नेटवर्क काय कामाचे? की स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादानेच ‘होमगार्ड’ दादागिरीने हा व्यवसाय चालवत होता? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.हद्दीतील गुन्हेगारीवर वचक कोणाचा? धानोरा सारख्या गावात होमगार्डच्या घरात असा प्रकार घडत असेल आणि बाहेरून येऊन विशेष पथकाला कारवाई करावी लागत असेल, तर स्थानिक ठाणे अंमलदार आणि अधिकारी नेमके काय करतात? हा केवळ ‘गुप्तचर यंत्रणेचा’ अपयश आहे की, डोळेझाक करण्यासाठी काही ‘अर्थपूर्ण’ तडजोडी झाल्या होत्या?, याची सखोल चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी करणे गरजेचे आहे.

जनतेचा सवाल: “सामान्य माणसाला त्रास देणारे पोलीस, स्वतःच्या खात्याशी संबंधित व्यक्तीचे अवैध धंदे का पाहू शकले नाहीत? रक्षकच जर भक्षक बनलेल्यांना पाठीशी घालत असतील, तर माता-भगिनींनी सुरक्षितता मागायची कोणाकडे?”

ग्रामस्थांकडून कारवाईचे स्वागत: होमगार्डच्याच घरात असा अनैतिक प्रकार सुरू असल्याने गावात संताप व्यक्त केला जात होता. पोलिसांच्या या कारवाईनंतर धानोरा गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच, या प्रकारचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कारवाईच्या वेळी घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी दोन्ही आरोपींवर अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) प्रमोद वाघ करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!