दीपनगरचा ‘बडा साहेब’ एसीबीच्या रडारवर; अवघ्या ५ हजारांच्या लाचेसाठी ‘अधीक्षक अभियंत्याची’ अब्रू वेशीवर!
बिलाच्या ५ टक्क्यांची 'टक्केवारी' भोवली; दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील वर्ग-१ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

जळगाव/भुसावळ | विशेष प्रतिनिधी शासकीय कंत्राटात ‘टक्केवारी’ची कीड किती खोलवर रुजली आहे, याचा धक्कादायक प्रत्यय भुसावळ येथील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात आला आहे. चक्क अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) दर्जाच्या वर्ग-१ अधिकाऱ्याने कंत्राटदाराच्या बिलातून ५ टक्के कमिशनसाठी तगादा लावला. अखेर तडजोडीनंतर ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज (दि. २०) भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
भानुदास पुंडलिक लाडवंजारी (वय ५७) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून, ते महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या (महाजेनको) दीपनगर केंद्रात अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
नेमके प्रकरण काय?
यातील तक्रारदार हे एका खासगी कंपनीत साईट सुपरवायझर आहेत. त्यांच्या कंपनीने २८ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दीपनगर येथील २१० मेगावॅट पॉवर प्लांटच्या तळाशी जमा झालेली सख (राख) उचलणे, मोडतोड आणि तेलाचे बॅरल काढण्याचे काम केले होते.
या कामाचे एकूण २,२८,५४४ रुपयांचे बिल मंजुरीसाठी मुख्य अभियंता (BTPS) यांच्या कार्यालयात सादर करण्यात आले होते. हे बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात अधीक्षक अभियंता लाडवंजारी यांनी सुरुवातीला एकूण बिलाच्या ५ टक्के रक्कमेची (अंदाजे ११,४०० रुपये) मागणी केली.
तडजोड आणि कारवाई
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने २९ एप्रिल २०२५ रोजी सापळा लावून पडताळणी केली असता, लाडवंजारी यांनी तडजोडीअंती ५,००० रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली आणि लाच मिळवण्याचा प्रयत्न केला.
जरी प्रत्यक्ष रक्कम स्वीकारताना (Trap) कारवाई झाली नसली, तरी लाचेची मागणी सिद्ध झाल्याने आज, २० नोव्हेंबर २०२५ रोजी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा (क्रमांक २१६/२०२५) दाखल करण्यात आला आहे.
तपास पथक:
सदर कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर आणि पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या पथकाने केली.



