शहरात ‘बॅग लिफ्टिंग’ करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा पर्दाफाश
स्थानिक गुन्हे शाखेने ८ लाखांची रोकड केली हस्तगत

जळगाव: एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला बॅग लिफ्टिंगचा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरी गेलेली ८,००,००० रुपये (आठ लाख) रोख रक्कम जशीच्या तशी हस्तगत करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी फिर्यादी विलास मधुकर जाधव (वय ६७ वर्ष, रा. जुनी जोशी कॉलनी, जळगाव) हे आपली रोकड घेऊन जात असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांची बॅग लांबवली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरनं. ८४१/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.

तपासाची चक्रे फिरली
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांना विशेष आदेश दिले होते.
त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे एक विशेष पथक तयार करून त्यांना तपासाच्या व गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.
आरोपी जेरबंद आणि मुद्देमाल जप्त
सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना, दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील संशयितांचा माग काढण्यात आला. या कारवाईत खालील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले:
१) विजय शांताराम पाटील (वय ४१ वर्ष, रा. कलावसंत नगर, जळगाव)
२) जितेंद्र छोटुलाल जाधव (वय ४४ वर्ष, रा. ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड, जळगाव)
पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी फिर्यादी विलास जाधव यांच्या ताब्यातून हिसकावून नेलेली ८,००,०००/- (आठ लाख) रुपयांची रोख रक्कम काढून दिली. ही रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. सदर आरोपींना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी व तपासासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.
तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. श्री. डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), मा. श्री. अशोक नखाते (अपर पोलीस अधीक्षक, जळगाव परिमंडळ) आणि मा. श्री. नितीन गणापुरे (उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांच्यासह खालील अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता:
पोलीस उपनिरीक्षक: शरद बागल, सोपान गोरे
पोलीस हेड कॉन्स्टेबल: प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, सलीम तडवी पोलीस कॉन्स्टेबल: सिध्देश्वर डापकर, रतनहरी गिते, मयुर निकम, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव)
तसेच तांत्रिक मदतीसाठी ‘नेत्रम’ येथील पोकों पंकज खडसे, मुबारक देशमुख, कुंदनसिंग बयास आणि ‘सायबर सेल’ येथील पोकों गौरव पाटील व मिलींद जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.



