जळगाव ‘लेडी चोर’ थेट बरेलीतून पकडली – ६ लाखांचे सोने परत!
CCTV ने उघड केला रहस्य! सोन्याच्या दुकानांत हातचलाखीने अंगठ्या गायब करणारी महिला गजाआड

जळगाव: जळगाव शहर आणि छत्रपती संभाजीनगर येथे सोन्याच्या दुकानांना लक्ष्य करून हातचलाखीने अंगठ्या चोरणाऱ्या एका सराईत महिलेला जेरबंद करण्यात जळगाव पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या ‘लेडी चोर’णीला थेट उत्तर प्रदेशातील बरेली येथून ताब्यात घेण्यात आले असून, तिच्याकडून चोरीच्या तिन्ही गुन्ह्यांमध्ये गेलेला सुमारे ६ लाख ६० हजार रुपये किमतीचा ६१.६७ ग्रॅम वजनाचा सोन्याचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ज्वेलर्स दुकानांमध्ये वाढलेल्या ‘अंगठी बदल’ चोरीच्या घटनांना चाप बसला आहे.
सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वाचे
दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० ते ५.३० वाजेच्या दरम्यान आर.सी. बाफना ज्वेलर्स, सुभाष चौक आणि भंगाळे गोल्ड, राजकमल टॉकीज, जळगाव येथे चोरीचा एक धक्कादायक प्रकार घडला होता. अनोळखी महिलेने हातचलाखीने सोन्याच्या अंगठ्या लंपास करून त्याऐवजी नकली अंगठ्या ठेवल्या होत्या. याप्रकरणी आर.सी. बाफना ज्वेलर्सचे व्यवस्थापक गणेश राजाराम काळे यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस स्टेशन येथे CCTNS CR NO- 239/2025 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एकाच महिलेने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले.तपास पुढे सरकत असताना, याच ‘लेडी चोर’णीने इतरत्रही गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्द: दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी पु.ना. गाडगीळ ॲण्ड सन्स, रिंग रोड, जळगाव येथील दुकानातही अशाच प्रकारे सोन्याच्या अंगठ्या बदलून CCTNS CR NO- 305/2025 अन्वये गुन्हा दाखल होता.
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद): या महिलेने छत्रपती संभाजी नगर, जिन्सी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आर.सी. बाफना ज्वेलर्स या दुकानातही असाच गुन्हा केला होता, ज्याबाबत CCTNS CR NO-308/2025 नुसार गुन्हा दाखल होता.

‘ऑपरेशन बरेली’ आणि मुद्देमाल जप्त
वरील सर्व गुन्ह्यांमध्ये चोरीची पद्धत (Modus Operandi) एकच होती आणि सीसीटीव्हीमध्ये एकच महिला दिसत असल्याने, पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध तपास सुरू केला.मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी आणि मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे आणि शनिपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ एक विशेष तपास पथक नेमले.
आणि तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवले काय काम लागेल.
तपासी अंमलदार पोहेकॉ/2834 प्रदिप रमेश नन्नवरे, त्यांच्या सोबत मपोहेकॉ/2908 वैषाली पावरा आणि पोकॉ/1546 निलेश घुगे यांच्या पथकाने थेट उत्तर प्रदेशातील बरेली येथे धडक दिली. अथक प्रयत्नानंतर या महिलेला ताब्यात घेण्यात यश आले. तिचे नाव लकी शर्मा उर्फ लकी शिवशक्ती पाठक असल्याचे उघड झाले आहे.या महिलेकडून तिन्ही गुन्ह्यातील ६ नग सोन्याच्या अंगठ्या असा ६,६०,०००/- रुपये किमतीचा एकूण ६१.६७ ग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..
सदर महिला सध्या शनिपेठ पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यात अटक असून, तिच्या आंतरराज्यीय गुन्हेगारी टोळीशी असलेल्या संबंधांचा आणि तिने इतरत्र केलेल्या गुन्ह्यांचा अधिक तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



