शिवकॉलनीत आज ‘जनजागृती भारूड’ कार्यक्रम; गोविंद महाराज गायकवाड यांचे समाजप्रबोधनात्मक सादरीकरण

जळगाव | शहर प्रतिनिधी शिवकॉलनी परिसरात आज बुधवार, दिनांक १७ डिसेंबर रोजी सायंकाळी जनजागृती भारूड मंडळ, आळंदी देवाची यांच्या वतीने विनोदातून समाजप्रबोधन करणारा भारूड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध भारूडकार ह.भ.प. गोविंद महाराज गायकवाड हे आपल्या खास शैलीतून सामाजिक विषयांवर प्रभावी प्रबोधन करणार आहेत.
समाजसेवक भिकनभाऊ हिवराळे यांचा स्तुत्य उपक्रम; विनोदातून प्रबोधनाची नागरिकांना मिळणार मेजवानी.
भारूड या महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून समाजातील व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, सामाजिक विसंगती यावर प्रबोधन करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. विनोद, संगीत आणि अभिनयाच्या माध्यमातून संदेश देणारे गोविंद महाराजांचे सादरीकरण प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे ठरणार आहे.
हा कार्यक्रम आज सायंकाळी ७ वाजता, गुरुकृपा क्लासेस समोरील ग्राऊंड, शिवकॉलनी, जळगाव येथे होणार असून नागरिकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमास शिवकॉलनी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून, भारूड कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



