प्रभाग ५ मध्ये बोगस मतदान कराल तर थेट जेलमध्ये जाल; उद्या मतदानादिवशी ॲड. पियूष पाटील यांची करडी नजर!
दुबार आणि बोगस मतदारांची यादी तयार; प्रशासनाला पुराव्यासह तक्रार सादर, गुन्हे दाखल करण्याचा इशारा.

जळगाव: उद्या (दि. २६) होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी जळगाव शहर सज्ज झाले असतानाच, प्रभाग क्रमांक ५ मध्ये मात्र वातावरण तापले आहे. बोगस आणि दुबार मतदारांच्या माध्यमातून निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उमेदवार ॲड. पियूष नरेंद्रअण्णा पाटील यांनी शेवटचा आणि कडक इशारा दिला आहे. “उद्या कुणीही बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील,” असे पाटील यांनी स्पष्ट केल्याने बोगसगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
निवडणूक पारदर्शकतेसाठी उचलले मोठे पाऊल प्रभाग क्रमांक ५ मधील मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर तफावत आढळली आहे. एकाच मतदाराचे नाव दोन ठिकाणी असणे, प्रभागात वास्तव्य नसतानाही नावे असणे आणि संशयास्पद कागदपत्रांवरून नोंदणी करणे, असे प्रकार उघडकीस आले आहेत. या विरोधात ॲड. पियूष पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत निवडणूक आयोगाकडे आणि पोलीस प्रशासनाकडे पुराव्यासह लेखी तक्रार केली आहे.
काय म्हणाले ॲड. पियूष पाटील? मतदानाच्या काही तास आधी आपली भूमिका मांडताना ॲड. पाटील म्हणाले की,
“लोकशाहीच्या उत्सवात बोगसगिरीला थारा नाही. काही लोक निवडणूक जिंकण्यासाठी अनैतिक मार्ग वापरत आहेत, पण आम्ही ते खपवून घेणार नाही. आम्ही संशयास्पद मतदारांची ‘वॉच लिस्ट’ तयार केली आहे. उद्या मतदान केंद्रावर आमचे प्रतिनिधी आणि सीसीटीव्ही कॅमेरे अशा लोकांवर लक्ष ठेवून असतील. जे लोक बोगस मतदान करतील, त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेनुसार जागीच गुन्हे दाखल करण्याची तयारी आम्ही केली आहे.”
बोगस मतदारांवर असा आहे ‘वॉच’ उद्या मतदानादरम्यान खालील बाबींवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे:
-
दुबार नाव असलेल्या मतदारांची ओळख पडताळणी.
-
संशयास्पद मतदारांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग.
-
बोगस आढळल्यास पोलिसांच्या ताब्यात देणे.
जिल्ह्यात खळबळ मतदानाच्या तोंडावर ॲड. पियूष पाटील यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी तयार केलेली ‘बोगस व्होटिंग’ची रणनीती यामुळे फोल ठरण्याची शक्यता असून, सजग नागरिकांकडून पाटील यांच्या या भूमिकेचे स्वागत होत आहे.



