अरे… बापरे! जळगावात एवढे गावठी पिस्तूल? जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या एका धडक कारवाईने उडाली मोठी खळबळ!
तब्बल ८ गावठी कट्टे अन् १० जिवंत काडतुसे जप्त; पाहा नेमकं काय घडलं?

जळगाव (प्रतिनिधी): मध्य प्रदेशातून गावठी पिस्तूल आणून जळगाव जिल्ह्यात बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटचे कंबरडे मोडण्यात जिल्हापेठ पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या धडक कारवाईत मुख्य शस्त्र विक्रेत्यासह एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या टोळीकडून तब्बल ८ गावठी पिस्तूल, १० जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अटकेत असलेल्यांमध्ये पोलिसांना विविध गुन्ह्यांत ‘वाॅन्टेड’ असलेल्या ३ सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे.

अशी उघडकीस आली शस्त्रास्त्रांची साखळी
जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. अनिल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, भज्जी गल्ली, इंडिया गॅरेजजवळ एक तरुण गावठी पिस्तूल बाळगून आहे. या माहितीवरून पोलिसांनी १ मार्च रोजी रात्री सापळा रचून यश रामदास नन्नवरे (वय २७, रा. धनगर बिल्डिंगजवळ, जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ गावठी पिस्तूल मिळून आले.
त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने हे पिस्तूल वरणगाव येथील केशव सुनील भालेराव (वय २३) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी लागलीच केशव भालेराव याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून पिंप्राळा येथील गौरव देविदास साळवे (वय २२) याचेही नाव निष्पन्न झाले. पोलिसांनी या साखळीचा मागोवा घेत या सर्वांना अटक केली.
मुख्य सूत्रधार ‘समाधान निकम’ अटकेत
या तीनही आरोपींकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी ही शस्त्रे यावल तालुक्यातील अंजाळे येथील समाधान बळीराम निकम (वय ४०) याच्याकडून विकत घेतल्याची धक्कादायक कबुली दिली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मुख्य सूत्रधार समाधान निकम याला अटक केली. तो मध्य प्रदेशातून गावठी पिस्तूल आणून जळगाव जिल्ह्यात विक्री करत असल्याची माहिती उघड झाली.
मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर कनेक्शन उघड
समाधान निकमने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी या साखळीतील आणखी तीन जणांना अटक केली. यामध्ये विकास प्रकाश काकडे (वय २८, रा. साळसिंगी, ता. बोदवड), थेट मध्य प्रदेशातील जगदीश गजानन महाजन (वय २०, रा. शहापूर, जि. बऱ्हाणपूर) आणि कैलास राजेंद्र माळी (वय २०, रा. बोरकुंड, ता. धुळे) यांचा समावेश आहे. या सर्वांकडून आणखी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.
सराईत गुन्हेगारांवर कारवाई
अटक करण्यात आलेला मुख्य सूत्रधार समाधान निकम याच्यावर चाळीसगाव, पाचोरा, फैजपूर आणि यावल पोलीस स्टेशनमध्ये आर्म अॅक्ट आणि इतर गंभीर स्वरूपाचे तब्बल ८ गुन्हे दाखल असून तो पोलिसांना ‘पाहिजे असलेला’ (Wanted) आरोपी होता. तसेच आरोपी केशव भालेराव आणि कैलास माळी हे देखील अनुक्रमे वरणगाव आणि पाचोरा पोलिसांत गंभीर गुन्ह्यांमध्ये ‘वाॅन्टेड’ होते.
जप्त केलेला मुद्देमाल:
- ८ गावठी पिस्तूल (किंमत २,८०,०००/- रुपये)
- १० जिवंत काडतुसे
- एक होंडा युनिकॉर्न दुचाकी (MH 19 CM 1312)
- एकूण हस्तगत मुद्देमाल: ३,१०,०००/- रुपये
या पथकाने केली कारवाई
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पो.स्टे.चे प्रभारी अधिकारी स.पो.नि. अनिल वाघ, पो.उ.नि. गोपाल देशमुख, पो.हे. महेश महाजन, नरेश सोनवणे, संदिप परदेशी, भरत चव्हाण, राहुल पाटील, समाधान पाटील, तेजस मराठे, ईश्वर खवडे आणि नरेंद्र दिवेकर यांच्या पथकाने केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये CCTNS No. ४४/२०२६ नुसार शस्त्र अधिनियम (Arms Act) कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उ.नि. गोपाल देशमुख करीत आहेत.



