बातम्या

जळगाव LCB ची धडक कारवाई: ७ लाखांचे ATM पळवणारी आंतरराज्यीय टोळी ११ दिवसांत जेरबंद

जळगाव (प्रतिनिधी): शहरातील पोलन पेठ भागातील इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे ७ लाखांची रोकड असलेले एटीएम मशीन पळवून नेणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) अवघ्या ११ दिवसांत मोठे यश आले आहे. तांत्रिक तपासात मिळालेल्या मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या टोळीतील दोन अट्टल गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांचा जिल्ह्यातील यावल आणि भुसावळ येथील एटीएम फोडण्याचा डाव चोरीपूर्वीच उधळून लावला आहे. या टोळीने जानेवारीपासून महाराष्ट्रात तब्बल पाच ठिकाणी याच पद्धतीने एटीएम चोरून लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.

जळगावातील घटना आणि गुन्ह्याची पद्धत:

दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी जळगाव शहरातील पोलन पेठ परिसरातील सत्यम प्लाझा कॉम्प्लेक्समधील ‘इक्विटास स्मॉल बँक’चे एटीएम ४ अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दोराने ओढून एका मालवाहू वाहनात टाकून लंपास केले होते. या एटीएममध्ये सुमारे ७ लाखांची रोकड होती. याप्रकरणी बँक मॅनेजर हरीष विजय गांधी यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोबाईल लोकेशनने उधळला पुढील डाव:

ही टोळी दर १५ ते २० दिवसांच्या अंतराने एटीएम चोरीचा कट रचते. जळगावात चोरी केल्यानंतर त्यांचा पुढील इरादा जिल्ह्यातील यावल आणि भुसावळ येथील एटीएम टार्गेट करण्याचा होता. यासाठी त्यांनी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे एक रूम भाड्याने घेतली होती. LCB चे पथक तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांच्या मोबाईल लोकेशनच्या मागावर होते. ते मन्यारखेडा (जि. जळगाव) परिसरात आल्याचे निश्चित होताच, १४ एप्रिल रोजी दुपारी पोलिसांनी सापळा रचला आणि मोबीन आत्मज मिला (वय २८) व अब्दुल करीम नुर हसन (वय ५२, दोघे रा. बेगी नाजर व तितरोद, ता. नकुर, जि. सहारणपूर, उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेतले.

पोलिसांच्या तपासात या टोळीची अत्यंत पद्धतशीर आणि नियोजनबद्ध गुन्हेगारी कार्यपद्धती उघड झाली आहे:

​रेकी आणि निवारा: ज्या गावात चोरी करायची आहे, त्यापासून ५० किलोमीटर अंतरावरील गावात हे चोरटे रूम करून राहतात. रेकी करताना शक्यतो सुरक्षेचा अभाव असलेल्या छोट्या बँकांच्या एटीएमची निवड केली जाते.

​चोरीचे वाहन: एटीएमपासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर रात्री उभ्या राहणाऱ्या मालवाहू वाहनाचा शोध आधीच घेतला जातो. एटीएम चोरी करण्याच्या बरोबर एक तास आधी हे चोरटे मास्टर चावीचा वापर करून ते वाहन चोरतात.

​दोराचा वापर: वाहनातून जाऊन एटीएम मशीनला दोर बांधून ते ओढून वाहनात टाकले जाते.

​पैसे काढणे आणि पलायन: चोरीनंतर निर्जन स्थळी जाऊन एटीएम मशीन फोडले जाते आणि रोकड काढली जाते. त्यानंतर टोळी दोन गटांत विभागली जाते. दोन जण दुचाकीवरून पसार होतात, तर उर्वरित तीन जण रोकड घेऊन रेल्वेने प्रवास करतात जेणेकरून संशय येऊ नये.

​तंत्रज्ञानाचा गैरवापर: तपासापासून वाचण्यासाठी या टोळीतील सदस्यांनी आतापर्यंत १०० पेक्षा अधिक मोबाईल क्रमांक (SIM cards) बदलल्याची माहिती पुढे आली आहे.

जानेवारीपासून महाराष्ट्रात घातला धुमाकूळ:

सहारणपूर (उत्तर प्रदेश) येथील बेगी गावाची पार्श्वभूमी असलेल्या या टोळीने महाराष्ट्र आणि झारखंडसह देशभरात एटीएम चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. महाराष्ट्रात त्यांनी केलेली मालिका खालीलप्रमाणे आहे:

​२६ जानेवारी: सटाणा (जि. नाशिक) येथे एटीएम लंपास केले.

​२४ फेब्रुवारी: नांदेड येथील एसबीआय (SBI) बँकेचे एटीएम फोडून ६.७३ लाख रुपये लांबवले.

​२५ फेब्रुवारी: छत्रपती संभाजीनगर येथे तब्बल १८ लाखांची रोकड असलेले एटीएम पळवले.

​२ मार्च: यवत (जि. पुणे ग्रामीण) येथील ‘इंडिया वन पेमेंट’ बँकेचे ७ लाखांची रोकड असलेले एटीएम चोरले.

​३ एप्रिल: जळगाव शहरातील इक्विटास बँकेचे ७ लाखांचे एटीएम पळवले.

अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. मात्र, या गुन्ह्यात सामील असलेले त्यांचे इतर तीन साथीदार — फरहान, अकबर आणि मुजाहीद हे अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. जळगाव पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे एका मोठ्या आंतरराज्यीय टोळीची साखळी खंडित झाली असून, आगामी काळातील मोठे गुन्हे टळले आहेत. फरार आरोपींच्या अटकेनंतर या रॅकेटचे आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता प्रशासकीय व पोलीस वर्तुळात वर्तवली जात आहे.

मार्गदर्शन आणि कारवाईतील पथक:

सदरची महत्त्वपूर्ण कारवाई मा.श्री. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगांव), मा.श्री. संदीप गावीत (अपर पोलीस अधीक्षक, जळगांव परिमंडळ) आणि मा.श्री. नितीन गणापुरे (उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगांव उपविभाग, जळगांव) यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक कारवाई केली. या तपास पथकामध्ये पोलीस उप निरीक्षक शरद बागल, पोउपनिरी सोपान गोरे, पोउपनिरी शेखर डोमाळे, पोउपनिरी जितेंद्र वल्टे, ग्रेपोउपनि रविंद्र नरवाडे, सहा. फौज. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, लक्ष्मण पाटील, सलीम तडवी, विनोद पाटील, पो.ना.अ. किशोर पाटील, विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख आणि पो. अ. रवींद्र कापडणे, राहुल रगडे, सिध्देश्वर डापकर, राहुल वानखेडे, प्रशांत परदेशी, छगन तायडे, हेंमत पाटील, रविंद्र चौधरी, सचिन घुगे तसेच चालक दिपक चौधरी, बाबासाहेब पाटील, प्रविण हिवराळे, दर्शन ढाकणे, रिझवान शेख, प्रदिप चौरे यांचा सहभाग होता. या क्लिष्ट गुन्ह्याच्या उकलीसाठी तांत्रिक मदत गौरव पाटील, मिलींद जाधव, ईश्वर पाटील, प्रदिप सपकाळे, पंकज पाटील, मुबारक देशमुख आणि कुंदनसिंग बयास यांनी पुरवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!