चोपडा शहर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक पवन देसले ‘ॲक्शन मोड’मध्ये!
पदभार घेताच बनावट दारू कारखान्यावर छापा

चोपडा: चोपडा शहर पोलीस स्टेशनचा पदभार नुकताच स्वीकारलेले नवनियुक्त पोलीस निरीक्षक पवन प्रतापराव देसले हे पहिल्याच दिवसापासून ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. पदभार स्वीकारताच त्यांनी धडक कारवाई करत चोपडा परिसरातील अकुळखेडा शिवारात सुरू असलेल्या एका बनावट विदेशी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून तो उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून १ लाख ८ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकांच्या या वेगवान कारवाईमुळे शहरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
नेमकी घटना काय?
सविस्तर माहितीनुसार, दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११:०० वाजेच्या सुमारास अकुळखेडा शिवार (ता. चोपडा) येथील गिरीराज लॉन्सच्या जवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये काही जण बेकायदेशीररीत्या बनावट दारू बनवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिथे छापा टाकला. त्यावेळी तिथे मानवी जीवितास अपायकारक असा बनावट मद्य तयार करून, ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने ‘रॉयल स्टॅग’ (ROYAL STAG) या नामांकित कंपनीच्या नावाने बनावट दारूची निर्मिती आणि पॅकिंग केली जात असल्याचे उघडकीस आले.
लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
- या मोठ्या कारवाईत पोलिसांनी एकूण १,०८,०८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या साहित्यामध्ये:
- ’रॉयल स्टॅग’च्या १८० मिली मापाच्या भरलेल्या बाटल्या आणि ३० लिटर बनावट दारूने भरलेला ड्रम.
- रॉयल स्टॅग कंपनीच्या तब्बल २५०० रिकाम्या काचेच्या बाटल्या.
- बाटल्यांना सील करण्यासाठी लागणारे ५००० छोटे आणि मोठे बूच (सीलिंग कव्हर).
- दारू बनवण्यासाठी लागणारे १५ लिटर गुळमिश्रित रसायन.
- पॅकिंगसाठी लागणारे बॉक्स, प्लॅस्टिक नळी, ट्रे आणि एक मोबाईल फोन.
- तिघांवर गुन्हे दाखल
याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण रवींद्र शिंपी (बक्कल नंबर ८७०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या विविध कठोर कलमांनुसार (गु.र.नं. १५१/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात खालील तीन आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे:
- १. राजवर्धन संजय पाटील (वय ३१ वर्षे, रा. थाळनेर दरवाजा, चोपडा)
- २. कपिल संजय पाटील (वय ३० वर्षे, रा. बोरोलेनगर २, चोपडा)
- ३. रवींद्र दिनकर पाटील (वय ४० वर्षे, रा. अकुळखेडा, ता. चोपडा – याने बनावट मद्याच्या बाटल्या विक्रीसाठी बाळगून मदत केली.)
पुढील तपास सुरू
पोलीस निरीक्षक पवन प्रतापराव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी हे करत आहेत. पदभार स्वीकारताच एवढी मोठी आणि धडक कारवाई केल्यामुळे चोपडा शहरात पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या ‘ॲक्शन मोड’ची जोरदार चर्चा सुरू आहे.



